खेळामुळे संघर्षाला तोंड देण्याची ताकद मिळते- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

सातारा, दि.१० :  खेळामुळे मानसिक ताकद, आत्मविश्वासाबरोबर आंतरिक ताकद मिळते. यामुळे जीवनात कोणत्याही मोठ्या संघर्षाला तोंड देता येवू शकते. ग्राम विकास विभागाच्या जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धांचे दर वर्षी आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे १० ते १२ जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.  यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, धैर्यशील कदम आदी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री म्हणून नाही तर एक सहकारी म्हणून या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला आलो आहे, असे सांगून ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले, या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सावाचे चांगले नियोजन केले आहे. याबद्दल सर्व अधिकारी, कर्मचाऱ्याचे अभिनंदनही त्यांनी केले.

बलशाही देश घडविण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करित आहेत. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. सातारा जिल्हा परिषद नेहमीच विविध योजना राबविण्यात अग्रेसर राहीली आहे. पुढील काळातही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजना गतीने सर्वसामान्यांपर्यंत पोहचवाव्यात. शासनाच्या १०० दिवसांच्या आराखड्यानुसार करण्यात येणाऱ्या कामांमध्ये सातारा जिल्हा राज्यात प्रथम राहील, अशी अपेक्षाही ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी व्यक्त केली.

वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात १२ संघांनी भाग घेतला आहे. १० ते १२ जानेवारी या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धांबरोबर सांस्कृतिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही सभाग असणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी प्रस्ताविकात सांगितले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ठ संचलन व चित्ररथाद्वारे संस्कृती व परंपरेचे दर्शन

वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव एकूण १२ संघांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असून त्यांनी आज उत्कृष्ट असे संचलन केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती यांनी चित्ररथाद्वारे ऐतिहासिक, संस्कृती, परंपरा यासह आरोग्य, शिक्षण व पर्यंटन याची माहिती चित्ररथाद्वारे दिली.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Source link

Comments (0)
Add Comment