वाहतुकीच्या नियमांचे पालन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

ठाणे, दि.11 (जिमाका) :- दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे मोटार वाहन विभाग आयोजित रस्ता सुरक्षित अभियान अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन संपन्न झाले. यानिमित्ताने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी आवाहन केले.

या कार्यक्रमास अप्पर परिवहन आयुक्त मुंबई श्री.भरत कळसकर,  जिल्हा शल्यचिकित्सक कैलाश पवार, सहायक आयुक्त शैलेश कामत, प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, ठाणे जिल्हा दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे व नितीन डोसा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर व आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात हा कार्यक्रम होत असतो. आज राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ठाणे जिल्ह्यात होत आहे, यानिमित्त उपस्थित सर्वांचे स्वागत आणि अभिनंदनही. वाहनचालकांनी नियमांचे पालन केले पाहिजे. परदेशात अपघाताचे प्रमाण का कमी आहे, याचा आपण अभ्यास करणे आवश्यक आहे. परदेशात ठिकठिकाणी रिफ्लेक्टर्स लावले जातात, जागोजागी सूचना फलक लावले जातात. जेणेकरुन वाहन चालवित असताना वाहनचालकांना नेमके कुठे जायचे, याचा बोध होतो. या विभागाकडून वाहतूकीच्या निकषात अधिक सुधारणा केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल. वाहतुकीची शिस्त पाळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. अपघात आणि मृत्यू प्रमाण कमी किंवा शून्य करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. यापुढे पार्किंग व्यवस्था नसेल तर नवीन वाहन नोंदणी केली जाणार नाही. यासाठी महापालिकेकडून भाडेतत्वावर नवीन वाहन पार्किंगसाठी मंजुरी मिळाली तर वाहन नोंदणी करणे शक्य होईल. यासाठी निकष व नियमांचे पालन करणे आवश्यकच आहे. तसेच प्रादेशिक परिवहन विभागानेही वाहनचालकांकडून  नियमांचे उल्लघंन होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते दोन माहिती पुस्तिकांचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी रस्ता सुरक्षा कार्यक्रम तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती दिली.

Source link

Comments (0)
Add Comment