Box Office Clash on 1st May :महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीचं औचित्य साधून अनेक सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. सिनेप्रेमींसाठी ही पर्वणी असली, तरी निर्माते, वितरक आणि थिएटर मालकांसाठी हा ‘स्क्रीन संग्राम’ ठरणार आहे. सिनेमागृहांच्या स्क्रीनवर कोणता सिनेमा टिकेल, कोणाला खाली उतरावं लागेल, कोण प्रेक्षकांची मनं जिंकेल आणि कोण केवळ पोस्टरपुरता उरेल; हे पाहणं रंजक ठरणार आहे.

‘आयपीएल’ सारखी सिनेमांची खेळपट्टी
केवळ १ मे हा दिवसच नव्हे, तर अलीकडे प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमा आणि येत्या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची रणधुमाळीसुद्धा सिनेमगृहात पाहायला मिळणार आहे. प्रत्येक शुक्रवारी किमान दोन बहुचर्चित आणि लोकप्रिय कलाकारांचे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. अगदी आयपीएलच्या टीम्सप्रमाणे सिनेमांच्याही टीम्स आहेत. त्यात मराठीसह हिंदी आणि हॉलिवूड सिनेमांचे पर्यायसुद्धा प्रेक्षकांसमोर आहेत. माव्र्व्हेलच्या ‘थंडरबोल्ट्स’नं तरुणवर्गाला अक्षरशः वेड लावलंय. अँटी-हिरोंच्या मिशनवर आधारित हा सिनेमा तंत्रज्ञान, स्टंट्स आणि स्टोरीलाइनमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी सज्ज आहे. मुंबईतल्या एका थिएटर मालकानं सांगितलं, ‘सिनेमा प्रदर्शित होण्यास दोन आठवडे शिल्लक असूनही ‘थंडरबोल्ट्स’ सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगची विचारणा होतेय. त्यात पहाटेचा पहिला शो हाऊसफुल्ल गेलाय. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पुढचे दोन दिवस हाऊसफुल्ल बुकिंग राहील यात शंका नाही.
स्पर्धा की संघर्ष ?
आमच्याकडे अवघ्या चार स्क्रीन्स आहेत आणि सात सिनेमे लागायचे आहेत. कोणता सिनेमा ठेवायचा आणि कोणाला वळवायचं याचं गणित बसवणं कठीण आहे.
वितरण संस्था म्हणतात…
हॉलिवूड आणि हिंदी सिनेमे जास्त स्क्रीन्स घेत आहेत. त्यात सोशल मीडियावर मार्व्हलचा ‘थंडरबोल्ट्स’ आधीच ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांची अवस्था बरी नाही.
सिनेमाकर्त्यांचं म्हणणं आहे…
एकाच दिवशी इतके सिनेमे प्रदर्शित करणं म्हणजे आर्थिक आत्महत्या. मोठ्या सिनेमांचा फायदा होत असला, तरी छोट्या बजेटच्या सिनेमांवर अन्याय होतो.
महाराष्ट्र दिनी मराठी चित्रपटांना करावा लागणार संघर्ष, एकाच दिवशी प्रदर्शित होणार तब्बल इतके सिनेमे
मराठी आणि हिंदीत चुरस
अजय देवगणचा ‘रेड २’ आणि हॉरर कॉमेडी असलेला ‘द भूतनी’ सुद्धा प्रेक्षकांना आकर्षित करण्यात मागे पडला नाही. या दोन हिंदी सिनेमांसमोर ‘गुलकंद’ हा नात्यांवर बेतलेला आणि ‘आता थांबायचं नाय’ सारखा वास्तविक सिनेमा आहे. त्यात ‘हिट द थर्ड केस’ने आणि ‘रेट्रो’ या दाक्षिणात्य सिनेमांचीही भर पडली आहे. एकाच मल्टिप्लेक्समध्ये चार स्क्रीन, पण सात सिनेमे. कोणाला किती शो मिळणार? दरम्यान मराठी सिनेमांचा ‘प्राइम टाइम शो’ मिळण्याचा मुद्दा पुन्हा चिघळला जाण्याची शक्यता आहे. ‘ही सगळी स्पर्धा प्रेक्षकांच्या वेळेसाठी आहे. सध्या सुट्टीचे दिवस आहेत. प्रत्येक सिनेनिर्मत्याला त्याचा सिनेमा सुट्टीत प्रदर्शित करायचा आहे. इतके सिनेमे एकाच दिवशी आले, की प्रेक्षकही गोंधळतात. परिणामतः काही सिनेमे सुरुवातीच्या तीन दिवसांतच थिएटरमधून हटवले जातात’, असं सिनेमा वितरक सांगत आहेत.
तीन जिवलग मित्रांचे सलग तीन सिनेमे !
दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता भरत जाधव आणि अभिनेता अंकुश चौधरी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. करिअरच्या सुरुवातीपासून हे तीन कलंदर कलाकार एकत्र आहेत. एकापेक्षा एक भन्नाट सिनेमे, नाटकांमधून त्या तिघांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या तिघांचे तीन वेगवेगळे सिनेमे लागोपाठ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. २५ एप्रिलला केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’, त्यांनतर १ मेला भरत जाधवचा ‘आता थांबायचं नाय’ आणि त्यानंतरच्या आठवड्यात ९ मेला अंकुश चौधरीचा ‘पीएसआय अर्जुन’ प्रदर्शित होतोय.
आमनेसामने
‘सुशीला सुजीत’ आणि ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’
‘देवमाणूस’ आणि ‘झापुक झुपूक’
‘आता थांबायचं नाय’ आणि ‘गुलकंद’
‘माझी प्रारतना’ आणि ‘पीएसआय अर्जुन’
‘एप्रिल मे ९९’ आणि ‘बंजारा’
१ मे रोजी प्रदर्शित होणारे सिनेमे !
मराठी :
‘आता थांबायचं नाय’,
‘गुलकंद’
हिंदी :
‘रेड २’, ‘द भूतनी’
दाक्षिणात्य सिनेमे :
‘रेट्रो’, ‘हिट – द थर्ड
केस’
हॉलिवूड :
‘थंडरबोल्ट्स’