Box office collection re released indian films:बॉलिवूडमध्ये सध्या जुन्या क्लासिक, हिट आणि गाजलेले चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, पूर्वी बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेले काही चित्रपट आता पुनःप्रदर्शनाच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहेत. त्यामुळे कमाईच्या दृष्टीनं निर्मात्यांनाही हा ट्रेंड हवाहवासा वाटतोय.
‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट पहिल्या प्रदर्शनावेळी केवळ ९ कोटी ११ लाख रुपयांची कमाई करू शकला होता. मात्र, रीरीलीजमुळे या चित्रपटानं तब्बल ५१ कोटींहून अधिक कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्याचप्रमाणे, ‘लैला मजनू’ या चित्रपटानं सुरुवातीला केवळ २ कोटी ८९ लाख रुपये कमावले होते, तर आता रीरीलीजदरम्यान केवळ चार दिवसांत ११ कोटी २० लाख रुपयांची कमाई केली. ‘तुम्बाड’ या चित्रपटानंही १३ कोटी ५७ लाख इतकी कमाई केली होती, पण आता त्यानं तब्बल ३२ कोटी ६५ लाख कोटींची कमाई करत यश मिळवलं.
पूर्वी अपयश, आता यश… असं का ?
पूर्वी अपयश मिळालेल्या सिनेमांना आता यश मिळतंय, याबाबत अभिनेता-निर्माता सोहम शाह म्हणाला, ‘नव्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना हवा तसा कन्टेंट मिळत नाही, त्यामुळे रीरीलीज झालेल्या जुन्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो. प्रत्येक चित्रपटाचा स्वतःचा एक ठरावीक प्रेक्षकवर्ग असतो. उदाहरणार्थ, ‘तुंबाड’च्या चाहत्यांची आवड वेगळी आहे, तसंच ‘सनम तेरी कसम’चा वेगळा प्रेक्षक आहे.’ ‘सनम तेरी कसम’चे दिग्दर्शक राधिका राव आणि विनय सप्रू याविषयी म्हणाले, ‘२०१६मध्ये आमच्या चित्रपटाचं योग्य प्रमोशन झालं नव्हतं. त्यामुळे अनेकांना तो माहीतही नव्हता. तो सिनेमागृहात फार दिवस न टिकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला नाही. आता मात्र लोक त्याच्याशी भावनिकरित्या जोडले गेले आहेत, म्हणून तो यशस्वी ठरत आहे.’
बडे सिनेमे पुन्हा भेटीला…
अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये नव्या चित्रपटांना अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे निर्माते आणि वितरक जुन्या यशस्वी आणि क्लासिक चित्रपटांचं पुनः प्रदर्शन करत आहेत. ‘शोले’, ‘रॉकस्टार’, ‘हम आपके हैं कौन’, ‘वीर जारा’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘कल हो ना हो’, ‘करण अर्जुन’, ‘जब वी मेट’ यांसारखे अनेक चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाले. तसंच लोकप्रिय कलाकारांच्या वाढदिवसानिमित्तही त्यांच्या चित्रपटांचे विशेष शो ठेवले जात आहेत. राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे गाजलेले सिनेमे, अमिताभ बच्चन यांच्या ८०व्या वाढदिवशी ‘दीवार’ आणि ‘अमर अकबर अँथनी’ आणि आमिर खानच्या वाढदिवशी ‘दिल चाहता है’, ‘पीके’, ‘श्री इडियट्स’ आणि ‘धूम ३’ हे सिनेमे चित्रपटगृहात दाखवले गेले.
दुसरी संधी
अनेक दिग्दर्शक आणि निर्माते त्यांच्या जुन्या दुर्लक्षित चित्रपटांना दुसरी संधी देण्याचा विचार करत आहेत.दिग्दर्शक हंसल मेहता ‘अलीगढ’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत, तर अभिनेता विनीत कुमार सिंह ‘मुक्काबाज’ या चित्रपटाच्या रीरिलीजबाबत विचार करत आहेत. जॉन अब्राहमनं अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘नो स्मोकिंग’ पुनःप्रसारित करण्यास उत्सुकता दाखवली आहे. ‘पिकू’ हा सिनेमाही पुढच्या महिन्यात पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतही रीरिलीजचे वारे
मराठी चित्रपटसृष्टीतही काही दर्जेदार चित्रपटांचं पुनर्प्रदर्शन होत आहे. ‘सैराट’ या सिनेमानं आता २०२५मध्येही उत्तम प्रतिसाद मिळवला. ‘नटरंग’, ‘दुनियादारी’, ‘कट्यार काळजात घुसली’ हे चित्रपटही पुन्हा सिनेमागृहात झळकण्याची शक्यता आहे. तसंच ‘टाइमपास’, ‘बालगंधर्व’, ‘फँड्री’ आणि ‘वळू’ हे चित्रपटही भविष्यात पुनर्प्रदर्शित होऊ शकतात.
सिनेमे आणि कमाई
(निर्माते आणि चित्रपट वितरक यांनी जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार)
सनम तेरी कसम (२०१६) :
रीलीज (नेट कलेक्शन) ९ कोटी ११ लाख, रीरीलीज (इंडिया कलेक्शन) ५१ कोटी ४ लाख
तुंबाड (२०१८) :
रीलीज (नेट कलेक्शन) १३ कोटी ५७ लाख, रीरीलीज (इंडिया कलेक्शन) ३२ कोटी ६५ लाख
लैला मजनू (२०१८):
रीलीज (नेट कलेक्शन) ३ कोटी ८९ लाख, रीरीलीज (इंडिया कलेक्शन) ११ कोटी २० लाख
संकलन: अदिती पवार, जे.पी. लॉ कॉलेज