हायलाइट्स:
- स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका योग्यच!
- माजी मंत्री नसीम खान यांनी पटोले यांचे केले समर्थन.
- स्वबळावर लढल्यास पक्ष संघटनाही मजबूत होईल.
मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवल्या पाहिजेत ही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका रास्तच आहे. पटोले यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असून आपले या भूमिकाला समर्थन असल्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी म्हटले आहे. ( Maharashtra Congress To Contest Polls Separately )
वाचा: ‘नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय, पण…’; भाजपची बोचरी टीका
नसीम खान म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्वात जुना पक्ष असून याआधी तो राज्यातही नंबर एकचा पक्ष राहिला आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षे काँग्रेसने एकहाती सत्ता आणलेली आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात आजही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार असून स्वबळावर निवडणुका लढल्यास पक्ष संघटनाही मजबूत होण्यास मदत होईल. राज्यातील पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात ही भूमिका रास्त आहे, असे नसीम खान म्हणाले.
वाचा: राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?; आठ दिवसांनंतर सरकार घेणार मोठा निर्णय
काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवल्यास त्याचा पक्षाला फायदा होणार आहे. काँग्रेसला राज्यात गतवैभव प्राप्त करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घेतली भूमिका हीच पक्षाची भूमिका आहे, असेही नसीम खान म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची सूत्रे नाना पटोले यांच्या हाती आल्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेतील मरगळ झटकून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. त्यातूनच स्वबळाचा नारा ते सातत्याने देत आहेत. एकीकडे आघाडी धर्म पाळून महाविकास आघाडीत भक्कमपणे साथ देत असताना दुसरीकडे काँग्रेसला गतवैभव मिळाले पाहिजे. पक्षाने स्वबळावर निवडणुका लढून आपली ताकद दाखवायला हवी, असा नाना पटोले यांचा आग्रह आहे. विशेष म्हणजे पटोले यांच्या या भूमिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून सावध प्रतिक्रिया येत असताना पक्षातून मात्र पटोले यांच्या भूमिकेचे समर्थन होऊ लागले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वाचा: मोदींना भेटण्यास मी इच्छूक होतो, पण…; काँग्रेसच्या मंत्र्याची ‘मन की बात’