हायलाइट्स:
- पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार.
- विस्तारात संधी मिळावी म्हणून अनेक नेत्यांची मोर्चेबांधणी.
- महाराष्ट्रातून नारायण राणे, प्रीतम मुंडे यांची नावे चर्चेत.
मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी आशा असून राणे तातडीने आजच दिल्लीला रवाना झाले आहेत. राणे हे दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत असून राणेंचे मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, याचे उत्तर तूर्त गुलदस्त्यात आहे. दरम्यान, राज्यातून खासदार प्रीतम मुंडे यांचे नावही मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. ( Union Cabinet Expansion Latest Update )
वाचा: शंभूराज देसाई यांच्यावर पाळत; दुचाकीवरून आलेल्या ‘त्या’ दोन व्यक्ती कोण?
करोना स्थितीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार सातत्याने लांबणीवर पडला आहे. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाचपणी सुरू केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना डच्चू, काही नव्या चेहऱ्यांची वर्णी तर काही मंत्र्यांचा खातेबदल केला जाण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता मंत्र्यांचे प्रगतीपुस्तकही तपासले जाणार असून त्याआधारावर विस्ताराला अंतिम रूप दिलं जाणार आहे.
वाचा: ‘आम्हीही तयार; भविष्यातही उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील’
राजधानीत या हालचाली सुरू असतानाच इच्छूकांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात महाराष्ट्रातून नारायण राणे आणि प्रीतम मुंडे ही दोन नावे चर्चेत आली आहेत. राणे हे मंत्रिपदाबाबत आधीपासूनच आशावादी आहेत. त्यात अमित शहा सिंधुदुर्ग येथे आले होते तेव्हा त्यांनी राणे यांच्या कार्याचा गौरव केला होता. ‘भाजपमध्ये नारायण राणे यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांचा सन्मानच होईल’, असे सूचक विधान शहा यांनी केले होते. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसोबतच राणे यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुख्य म्हणजे राणे हे आजच दिल्लीला रवाना झाले असून ते जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याचे कळते. याबाबत राणे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शिवसेनेला शह देण्यासाठी तसेच मराठा नेता म्हणून राणे यांच्या नावाचा विचार मोदींकडून होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या डॉ. प्रीतम मुंडे यांचे नावही मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. बीडमधून त्या दोन वेळा निवडून आल्या आहेत. मतदारसंघातील विकासकामांच्या जोरावर त्यांचं पारडं जड मानलं जात आहे.
वाचा: ‘संभाजीराजे जंटलमन पण आरक्षणासाठी कुणाला कुठं गाठायचं हे मी बघतो’
दरम्यान, शिवसेना आणि अकाली दल या दोन पक्षांनी एनडीएला रामराम ठोकला आहे. या पक्षांच्या वाट्याला आलेली दोन मंत्रिपदे रिक्त आहेत. कॅबिनेट मंत्री रामविलास पासवान आणि राज्यमंत्री सुरेश आंगडी यांच्या निधनामुळे ती पदेही रिक्त आहेत. त्यात मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये एकदाही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. काही मंत्र्यांकडे अतिरिक्त मंत्रालयांचा भार दिला गेलेला आहे. हे पाहता बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आता टाळला जाणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यात आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, खासदार ज्योतिरादित्य शिंदे, वैजयंत पांडा ही नावे आधीपासूनच चर्चेत आहेत.
धक्कादायक: शिर्डीत अवघ्या ५ महिन्यांच्या मुलीला म्युकरमायकोसिस