एरंडोल नगरपालिकेला “कचरा मुक्त शहर”या घटकांमध्ये ३स्टार मानांकन प्राप्त ; भारताचे राष्ट्रपती कोविंद यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे मिळाला बहुमान..!

(शैलेश चौधरी)

एरंडोल: केंद्र शासनातर्फे मागील वर्षापासून सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२०-२१ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण व कचरा मुक्त शहर या अभियानाचा नवी दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती मा.रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते २० नोव्हेंबर रोजी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.


एरंडोल शहराने कचरा मुक्त शहर या घटकांमधील ३चांदण्यांचे मानांकन प्राप्त केल्याने एरंडोल नगरपरीषदेचा सन्मान राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत भारत सरकार सचिव दुर्गाशंकर मिश्रा व सहसचिव रूपा मिश्रा यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन बहुमान प्रदान करण्यात आला. यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी तथा सध्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी (नाशिक) किरण देशमुख,विद्यमान मुख्याधिकारी विकास नवाळे,कार्यालय अधीक्षक हितेश जोगी,आरोग्य निरीक्षक अनिल महाजन, मुकादम आनंद दाभाडे हे उपस्थित होते.


वेस्ट झोन मधून एरंडोल नगरपालिकेला २८वा क्रमांक प्राप्त झाला.
सदरील बहुमानाबाबत एरंडोल नगरपालिकेचे अध्यक्ष रमेश सिंग परदेशी,मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी रविवारी दि.२१ रोजी संध्याकाळी पत्रकार परीषद घेऊन सांगितले की वेस्ट झोनमध्ये ३०४ नगरपालिकांनी सहभाग नोंदविला होता.त्यात एरंडोल नगरपालिकेने पहिल्या पन्नास मध्ये येण्याचा बहुमान मिळवला आहे.याकामी विभागीय स्तर व जिल्हास्तरावर एरंडोल नगरपालिका प्रथम तर राज्यस्तरावर पहिल्या दहामध्ये येण्याची शक्यता आहे. सदर सर्वेक्षणामध्ये एरंडोल नगरपालिकेने पाच घंटागाड्यांद्वारे घरोघरी जाऊन ओला-सुका घरगुती,घातक कचरा व प्लास्टिक अशाप्रकारे कचऱ्याचे जागेवरच वर्गीकरण करून संकलन केले आहे व अजूनही ते करीत आहेत.यामध्ये एरंडोल नगरपालिकेकडून प्लास्टिक गोळा व जप्त करून एरंडोल शहरात प्लास्टिक मुक्ती देखील करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

     नगराध्यक्ष रमेश सिंग परदेशी पुढे म्हणाले की शहरातील नागरीकांना यापूर्वी अवाजवी चार टक्के विकास कराची आकारणी करण्यात आली असता सदर विकास दर १ टक्के इतका कमी करण्यात आला आहे.कोरोना विषाणूं चा प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर बर्‍याच नागरीकांच्या रोजगार व उद्योगधंद्यांमध्ये घट झाल्याने या वर्षी होणारी चतुर्वार्षिक कर आकारणी सद्यस्थितीत स्थगित ठेवण्यात आलेली असून वाढीव कर आकारणी करण्यात आलेली नाही . "माझी वसुंधरा अभियानाबाबत नगराध्यक्ष परदेशी म्हणाले की ज्या नागरीकांनी रेन वाँटर हार्वेस्टिंग केली असेल त्यांना एकत्रित मालमत्ता करातून एक टक्के सूट, सोलर इलेक्ट्रिक सिस्टीम कार्यान्वित केलेली असेल त्यांना एकत्रित मालमत्ता करातून एक टक्के सूट, होम कम्पोस्टिंग केली असेल त्यांना एक टक्के सूट, आपल्या स्वमालकीच्या जागेत किमान पाच वृक्ष लावून त्यांचे संगोपन केले असल्यास त्यांना एकत्रित मालमत्ता करातून एक टक्के सूट व ज्या इमारतीस शासन मान्य अभिकरणा करून हरित इमारत म्हणून घोषित करण्यात आली असेल त्यांना एकत्रित मालमत्ता करातून पाच टक्‍के सूट देण्याचा ठराव नगरपालिकेने पारित केला आहे. याबाबतची अंमलबजावणी २०-२२-२३ संबंधित पात्र लाभार्थ्यांसाठी करण्यात येणार आहे एरंडोल नगरपालिकेतर्फे नर्सरी तयार करण्यात येत असून जे नागरीक वृक्षसंवर्धना करीता इच्छुक असतील अशा नागरीकांना रोपांचे देखील वाटप करण्यात येणार आहे नागरीकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
 ‌
               एरंडोल नगरपालिकेच्या शिरपेचात हा नवा बहुमान रोवला गेला असून त्यासाठी भाजपा विभागीय संघटन मंत्री एडवोकेट किशोर काळकर,नगराध्यक्ष रमेश परदेशी,उपनगराध्यक्ष कुणाल महाजन,सर्व नगरसेवक-सर्व नगरसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे सर्व अधिकारी,सफाई कामगार,सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच शहरवासीयांनी सुद्धा मोलाचे सहकार्य या कामी केले.
Comments (0)
Add Comment