पाळधी महामार्गावर फरकांड्याच्या कापूस व्यापाऱ्याची हत्या.!

धरणगाव:जिल्हा संपादक – शैलेश चौधरी तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा मंदिराजवळ अज्ञात टोळक्याने केलेल्या चाकूहल्ल्यात एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील रहिवाशी कापूस व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.चाकूहल्ल्यात मृत्यू झालेल्या फरकांडे येथील या व्यापाऱ्याचे नाव स्वप्नील रत्नाकर शिंपी ( वय ३२ ) आहे.स्वप्नील शिंपी हे दिलीप उर्फ गुड्डू राजेंद्र चौधरी ( वय ३२, रा – फरकांडे ) यांच्यासोबत भागीदारीमध्ये कापसाचा व्यापार करीत होते. हे दोघे भागीदार होंडा सिटी कारने ( क्रमांक एम.एच.०१ ए.एल. ७१२७ ) ने जळगावला त्यांची रक्कम घेण्यासाठी आले होते. जळगावला येऊन ते त्यांना मिळालेले व्यवसायातील जवळपास १० ते १५ लाख रुपये घेऊन माघारी आपल्या गावी फरकांडे येथे त्यांच्या कारने निघाले होते .पाळधीजवळ साईबाबा मंदिराजवळच्या पेट्रोल पंपाजवळ ते आले असता मोटारसायकलींवरून आलेल्या अज्ञात ४ ते ५ जणांच्या टोळक्याने शिंपी यांच्या होंडा सिटी कारला त्यांच्या मोटारसायकली आडव्या लावून कट का मारला..? म्हणून वाद घातला. शिंपी आणि त्यांच्या भागीदाराने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला,मात्र कार चालवत असलेले स्वप्नील शिंपी यांना कारमधून खेचून या टोळक्याने बाहेर काढले व त्यांच्या पाठीवर तसेच मांडीवर चाकूने वार केले . या झटापटीत या टोळक्याने स्वप्निल शिपी यांच्या ताब्यातून पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला.मात्र दिलीप चौधरी व स्वप्नील शिंपी यांच्या प्रतिकारामुळे या टोळक्याचा पैसे हिसकावण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्यांची ही रक्कम वाचली. हा गदारोळ व आरडा-ओरड सुरु असताना जवळच्या पेट्रोलपंपावर असलेले ३ ते ४ लोक या दोघांच्या मदतीला धावून आले. ते लोक येत असल्याचे पाहून सावध झालेल्या हल्लेखोरांच्या तावडीतून चौधरी थोडक्यात वाचले.मदतीला आलेले लोक पाहून हे टोळके पसार झाले. स्वप्नील शिंपी गंभीर जखमी अवस्थेत दगड – विटांनी या टोळक्याचा प्रतिकार करत पाळधीच्या दिशेने मदत मिळावी या आशेने धावण्याचा प्रयत्न करीत होते ! त्यांचे जोडीदार दिलीप चौधरी हेही जमेल तसा या हल्लेखोरांचा हल्ला अडवण्याचा प्रयत्न करीत होते.मदतीला धावून आलेल्या लोकांच्या सहकार्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संस्थेच्या रुग्णवाहिकेतून स्वप्नील शिंपी यांना जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र दाखल करताना सी.एम.ओ-डॉ.कळसकर यांनी त्यांना मयत घोषित केले. स्वप्नील शिंपी यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी आणि १ मुलगी असा परीवार आहे. स्वप्नील शिंपी हे घरातील कर्ते आणि एकुलते एक होते.

crime newsJalgaonJalgaon policePolice timetejpolicetimesपाळधी महामार्गावर फरकांड्याच्या कापूस व्यापाऱ्याची हत्या.!व्यापारी
Comments (0)
Add Comment