पुणे शहरात जबरी चोऱ्यांमध्ये मोठी वाढ; कारण काय?

म. टा. प्रतिनिधी, पुणेः शहरातील जबरी चोऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. दुचाकीवरील चोरट्यांकडून एकट्यादुकट्या व्यक्तींना अडवून शस्त्राच्या धाकाने लुटण्याच्या प्रकारांमुळे शहरात घबराट पसरली आहे. शहरात मागील दोन दिवसांत जबरी चोरीच्या तीन घटना घडल्या असून, याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे विद्यापीठात वास्तव्यास असणारे अमोल भाऊराव शिरतुरे (वय ३८) रविवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास मालधक्का चौकाजवळून पायी निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या हातातील १६ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावला. याबाबत शिरतुरे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू आहे.

कात्रजच्या शेलारमळा परिसरात राहणारे संजय दशरथ शेडगे (वय ५१) सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्याने दुचाकीवरून कामासाठी निघाले होते. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना अडवून हत्याराचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या खिशातील १९०० रुपयांची रोकड आणि कागदपत्रे जबरदस्तीने हिसकावली. तसेच, त्या ठिकाणी जमलेल्या नागरिक आणि दुकानदारांना कोयत्याच्या धाकाने दमदाटी करून दहशत निर्माण केली. भीतीपोटी दुकादारांनी आपापली दुकाने बंद केली. याबाबत भारती विद्यापीठ अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फुरसुंगीतील कामठे मळा परिसरात तरुणाच्या डोळ्यात तिखट टाकून ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अक्षय दत्तात्रय शिर्के (वय २५, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चोरट्यांच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय दुचाकीवरून घरी निघाला होता. त्या वेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी अक्षयच्या डोळ्यात तिखट टाकले. त्यामुळे अक्षय दुचाकीवरून खाली पडला. त्यानंतर चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून त्याची दुचाकी जबरदस्तीने पळवली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस तपास करत आहेत.

पोलिसांचे अपयश कारणीभूत

शहरात दररोज जबरी चोरीचे एक ते दोन प्रकार समोर येत आहेत. चोरटे एकट्या व्यक्तींना अडवून शस्त्राचा धाक दाखवून लुटत आहेत. चतुःश्रुंगी परिसरात बँकेत पैसे भरण्यासाठी जाताना तरुणाला लुटण्यात आले. महमंदवाडी परिसरातही पेट्रोल पंपाची रोकड घेऊन निघालेल्याला लुटले. लुटालुटीचे प्रकार वाढत असतानाच आरोपींना पकडण्यात पोलिस कमी पडत असल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे.

Source link

crime in PunePune crime newsPune newsrobberies in puneचोऱ्यांमध्ये वाढ
Comments (0)
Add Comment