हायलाइट्स:
- मुंबईत शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप
- भाजप नेत्यांची शिवसेनेवर चौफेर टीका
- नीलेश राणेंचा जशास तसं उत्तर देण्याचा इशारा
मुंबई: दादर येथील शिवसेना भवनसमोर शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आज समोरासमोर आले. यावेळी शिवसैनिकांनी काही भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या मारहाणीच्या घटनेवर भाजपच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी या प्रकरणावर भाष्य करताना शिवसेनेला थेट इशाराच दिला आहे. (Nilesh Rane Warns Shiv Sena)
‘मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचं मला माहीत नाही. खरोखरच तसं काही झालं असेल तर त्याचं जशास तसं उत्तर मिळेल. हल्ला करणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल,’ असं नीलेश राणे यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
वाचा:मुंबईत सेना भवनासमोर राडा! भाजपच्या ‘फटकार’वर शिवसैनिकांचे ‘फटकारे’
शिवसैनिकांकडून भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचाही आरोप होत आहे. त्यावरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ‘महिलांचा सन्मान करणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे? काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करणारी बाळासाहेबांची शिवसेना कुठे? आता त्यांच्या वळचणीला बसत राम मंदिराला आडकाठी आणणारी आजची शिवसेना कुठे? सत्तेपाई सत्व गमावले,’ अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.
भाजपच्या आंदोलनात चुकीचं काय होतं?
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘भाजपचे कार्यकर्ते शिवसेना भवनावर चाल करून गेले नव्हते. शिवसेनेकडून तसं भासवलं जात आहे. ‘सामना’तून राम मंदिराच्या जागेबाबत आक्षेपार्ह लिखाण केलं गेलं. त्याचा निषेध करण्यासाठी लोकशाही मार्गानं कोणी रस्त्यावर उतरत असेल तर त्यात काय चुकीचं आहे? ही निदर्शनं काही अंतरावर केली जाणार होती. असं असताना भाजपचे लोक हातात दगड घेऊन आले, ते शिवीगाळ करत होते, असा काहीतरी खोटा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणं किती योग्य आहे? भाजपमध्ये हिंसक आंदोलन करणारे कार्यकर्ते आहेत का? याचाही विचार करायला हवा,’ असं दरेकर यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी सत्यता तपासून दोषींवर कारवाई करावी. शिवसेना सत्तेत आहे म्हणून पोलिसांनी त्याकडं दुर्लक्ष करू नये,’ अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे.
वाचा: मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन सुरू असताना संजय राऊतांचं मोठं विधान