शिवप्रसादमध्ये शिवला अभिप्रेत असणारे काम आमच्या पक्षाकडून सुरू आहे. प्रसाद देखील आमच्याकडे आहे. तुम्ही शिवभोजन थाळी जेव्हा द्यायची तेव्हा द्याल, परंतु आम्ही काही तोंडाला पट्टी लावून बसलो नाही. जर आम्ही भंडाऱ्याची व्यवस्था केली तर तुम्हालाही पंक्तीला बसावे लागेल, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
काल मुंबईतील शिवसेना भवनाजवळ भाजप कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळून आला. त्यावेळी आता प्रसाद दिला आहे, पुढे शिवभोजन थाळी देऊ, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावर दरेकर यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.
क्लिक करा आणि वाचा- किडनीला झाली होती काळ्या बुरशीची लागण, डॉक्टरांनी ‘असा’ वाचविला जीव
खासदार संजय राऊत हे दोन्ही बाजूंनी मत मांडत आहेत. एका बाजूने म्हणायचे कालचा विषय संपला आणि दुसऱ्या बाजूने शिवप्रसाद आणि शिवभोजन थाळी देण्याबाबत बोलायचे. शिवसेनेच्या हिंदुत्व, देव आणि दैवत याविषयीच्या भूमिका पातळ होत चालल्या आहेत, असे दरेकर यांनी म्हटले आहे. तुमच्या शिवथाळीपेक्षा आम्ही भंडाऱ्याची व्यवस्था करू म्हणजे थोडे पुण्य आमच्या पदरी पडेल. आम्ही मूग गिळून बसणाऱ्यांपैकी नाही, असेही दरेकर पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- ‘शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही’; चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य
संजय राऊत यांनी शिवप्रसाद आणि शिवभोजन थाळीमध्ये आपला वेळ वाया घालवू नये. वाझे तर जेलमध्ये आहे, आता तर प्रदीप शर्मा देखील जेलच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राऊत यांनी त्यांच्या भत्याचा विचार करावा, असा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे.
सचिन वाझेंसाठी शिवसेनेचे मंत्री विधिमंडळाच्या अधिवेशनात भांडत असल्याचे आपण पाहिले आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्रीही त्यांची बाजू घेत होते. त्यावेळी वाझे हे काय लादेन आहे का?, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते, याकडेही दरेकर यांनी लक्ष वेधले.
क्लिक करा आणि वाचा- बलात्काराच्या गुन्ह्यात अखेर निलंबित पोलीस निरीक्षकाला अटक
मनसुख हिरेनप्रकरणी एनआयएचा तपास सुरू आहे. या प्रकरणात संशयाची सुई एकाच दिशेने जात आहे. राऊत यांनी या प्रकरणात आधी लक्ष देणे आवश्यक आहे. भोजन तर तुम्हाला भंडाऱ्यामध्ये जेवायचेच आहे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे.