हायलाइट्स:
- शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या चर्चेवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
- शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीबाबत राऊतांची घोषणा
- काँग्रेस स्वबळावर तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील?
मुंबई : राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यातच भाजप विरोधी पक्षात बसला आहे. पण आगामी निवडणुकांमध्ये हे चित्र बदलणार का असा प्रश्न आता सगळ्यांसमोर उपस्थित होतो. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीबाबत मोठी घोषणा केला. या वक्तव्यानंतर आता काँग्रेसने सुद्धा आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येत असेल. पण हे सोडून जनतेच्या कामांसाठी आपल्याला एकत्र यायला हवं असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. ते टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केल्याने राजकीय पटलावर त्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील, अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या भूमिकेचे समर्थन केले होतं.
दरम्यान, काँग्रेसमध्ये निवडणुकांबद्दल अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून काम करण्यावर भर देण्यात येत असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. हे तीन पक्षांचं सरकार आहे. जे प्रश्न निर्माण झाले त्याचा मार्ग काढतो, प्रश्न सुटलेले दिसतात. संजय राऊत यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबाबत मी भाष्य करणे योग्य नाही, असंही थोरातांनी सांगितलं.