हायलाइट्स:
- तब्बल १३० दिवसांनी नागपूरकरांनी चांगली बातमी
- करोनाच्या जीवघेण्या संसर्गाची साखळी तोडण्यात नागपूरकरांना यश
- नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन
नागपूर : करोनाच्या दुसऱ्या लाटेतून राज्य बाहेर येत असताना आता नागपूरकरांसाठीही दिलासादायक बातमी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज शेकडो मृत्यूची झळ सोसणाऱ्या नागपूरला १३० दिवसांच्या खंडानंतर प्रथमच दिलासा मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार शहरात आज कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. यामुळे करोनाच्या जीवघेण्या संसर्गाची साखळी तोडण्यात नागपूरकरांना यश आलं असंच म्हणावं लागेल.
अधिक माहितीनुसार, तब्बल १३० दिवसांनी शहरात करोनचे मृत्यू तांडव आज थांबले. 7 फेब्रुवारी 2021 ला एकही कोरोना मृत्यू नव्हता. त्यानंतर १३० दिवसांनी करोनामुळे आज कोणताही मृत्यु नाही. एप्रिल आणि मे महिन्यात नागपुरात संसर्गाचं थैमान होतं. दिवसाला १०० च्यावर मृत्यू होत होते. मात्र, जून महिन्यापासून करोनाचा प्रकोप कमी झाला.
यानंतर डॉक्टर आणि प्रशासनाच्या प्रयत्नामुळे करोना नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी करोनाबाबतचे नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांनी केलं आहे. दरम्यान, एकीकडे करोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधील बंधने आता शिथील करण्यात आली आहेत. त्यामुळे परत एकदा अचानक गर्दी वाढू लागली आहे. ही गर्दी बघता पुढील २ ते ४ आठवड्यांत राज्यात करोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा धोक्याचा इशारा महाराष्ट्र टास्क फोर्सने राज्य सरकारला दिला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांतील जी मुले फारशी बाहेर पडत नाहीत, त्यांना या लाटेचा फारसा धोका नसल्याचा अंदाजही टास्क फोर्सने व्यक्त केला आहे.