हायलाइट्स:
- राहुल गांधी यांच्या वाढदिवीशीही स्वबळाचा सूर.
- महाराष्ट्रात काँग्रेस नंबर वन करण्याचा निर्धार.
- नाना पटोले यांच्या भूमिकेचे नेत्यांकडून समर्थन.
मुंबई:काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काँग्रेस नेत्यांनी आज राज्यात आणि देशात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा नंबर वन करण्याचा संकल्प सोडला. गेले काही दिवस राज्यातील निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बोलून दाखवत असताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील याच्या उपस्थितीत टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमातही आज हाच सूर निघाला. ( Maharashtra Congress Latest Update )
वाचा:‘या’ स्थितीत स्वबळाची भाषा कराल तर लोक जोडे मारतील: उद्धव ठाकरे
राहुल गांधी यांचा वाढदिवस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विविध कार्यक्रम राबवून संकल्प दिन म्हणून साजरा केला. त्याचे एच. के. पाटील यांनी कौतुक केले. प्रदेश काँग्रेसने केलेल्या विविध कार्यक्रमांतून एक चांगला संदेश देशभरात गेला असून करोनामुळे संकटात असलेल्या गरजू, गरिब लोकांना रेशन, औषधे, वैद्यकीय साहित्य वाटप करून काँग्रेस पक्षाचे प्राधान्य हे प्रथम जनहित आहे हे दाखवून दिले आहे. करोना संकट मोदी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे हातळल्याने देश २० वर्ष मागे गेला आहे. सामान्य लोकांचे संसार आज उघड्यावर आले आहेत. डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी यांनी केलेल्या सूचनांचा विचार न केल्यामुळे देशाला मृत्यूच्या खाईत लोटण्याचे काम केले गेले आहे. या मोदी सरकारच्या खोटारडेपणाचा मुकाबला करत महाराष्ट्रासह देशभर काँग्रेस पक्षाला मजबूत करणे हाच राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचा खरा संकल्प ठरेल, असे एच. के. पाटील म्हणाले.
वाचा:शिवसेनेचे भवितव्य काय?; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले मोठे विधान
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, मागील ७ वर्षापासून देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार असून ते मनमानी पद्धतीने काम करत आहे. राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लोकांच्या हितासाठी अनेकदा सूचना केल्या. त्या सूचना किती हितकारक होत्या त्याची जाणीव आता होत आहे. नोटबंदी, जीएसटी, करोना संकट यावर त्यांनी विधायक सूचना केल्या पण त्याकडे मोदी सरकारने लक्ष दिले नाही त्याचा परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. राहुल गांधी यांनी मांडलेली भूमिका मोदींनी स्वीकारली असती तर मोठी हानी टळली असती. देशाला आता दूरदृष्टी असलेला, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणाऱ्या, सर्वसमावेशक अशा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची गरज आहे आणि देशातील तरुणवर्गही राहुल गांधी यांना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे पाहू इच्छित आहे. राहुल गांधी हे मोदी सरकारविरोधात संघर्ष करत आहेत त्यांच्या या संघर्षाला ताकद देऊन महाराष्ट्रात काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा आपला संकल्प आहे.
वाचा:‘सत्ता गेल्याने काहींचा जीव कासावीस’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला
यावेळी बोलताना मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात नाईलाजाने काँग्रेस पक्षातून काही लोकांना बाहेर जावे लागले त्या सर्वांसाठी घरवापसीचा कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. जनसंपर्काचे अभियान हाती घेऊन आगामी काळात कामाला लागले पाहिजे. राहुल गांधींच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम करण्यासाठी पक्ष संघटना व शासन एकत्र येऊन काम करावे लागणार आहे, यातूनच काँग्रेस पक्षाचा विस्तार होईल. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशाला आज राहुल गांधी यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. खऱ्या अर्थाने आज काँग्रेसचा संकल्प दिन आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाला राज्यात पुन्हा एकदा नंबर एकचा पक्ष करण्यासाठी आपणास काम करावे लागणार आहे.
नाना पटोलेंनी वादळ उठवून दिलं!
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन अवघ्या तीन चार महिन्यातच वादळ उठवून दिले आहे, याचा अभिमान वाटतो. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा त्याग करून ते पक्षासाठी ही पालखी घेऊन पुढे निघाले आहेत. खुर्ची सोडून पक्षासाठी वाहून घेणे ही साधी गोष्ट नाही. स्वबळावर निवडणुका लढवण्याचा त्यांचा नारा हा संघटनेत नवी उमेद व ताकद उभी करण्याचे काम करणारा आहे. नाना पटोले हे काँग्रेसचा झेंडा घेऊन नव्या जोमाने निघाले आहेत. खऱ्या अर्थाने ते बारा बलुतेदारांचे कैवारी असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा जोमाने उभी राहील.
दरम्यान, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार दिलीप बनसोड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
वाचा: मुख्यमंत्रिपदाची जागा रिकामी नाही; प्रफुल्ल पटेल यांनी लगावला टोला