‘सरकारवर कोणी टीका केली किंवा मित्रपक्षातील कोणी काही बोलले, तर शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी उत्तर देऊ नये. त्याबाबतची अधिकृत भूमिका वरिष्ठ नेते घेतील. सरकारमधील तीन पक्षांना पक्षसंघटना वाढविण्याचा अधिकार आहे. आपला पक्ष वाढवताना मित्रपक्षातील कोणाचेही मन दुखवू नका,’ अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शहरपातळीवरील स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना शनिवारी दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रवक्ते अंकुश काकडे, खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे व चेतन तुपे, महापालिकेतील विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.
‘पक्ष स्थापनेनंतर पक्ष कार्यालय छोट्याशा जागेत होते. नंतर २००३पासून आतापर्यंत गिरे कुटुंबीयांनी त्यांचा टिळक रस्त्यावरील बंगला कार्यालय म्हणून वापरण्यास दिला. १८ वर्षांत त्यांनी भाडे घेतले नाही. नवीन कार्यालय शहराच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक विकासाचे व्यासपीठ ठरेल,’ असे पवार यांनी सांगितले.
वाचा:स्वबळाचं नंतर ठरवा, आधी…; संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
‘कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांचा सन्मान राखा. सर्व जाति-धर्माच्या लोकांना न्याय दिला पाहिजे. प्रत्येक नागरिकाचे काम होईल, असे नाही. माझ्याकडूनही सगळी कामे होत नाहीत; पण आपण सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे,’ असा सल्ला त्यांनी दिला.
‘नवीन चेहऱ्यांना संधी द्या’
‘शहर कार्यकारिणीत नवीन चेहऱ्यांना संधी द्या. पक्षाच्या बैठकीसाठी महत्त्वाच्या व्यक्तींना बोलवा. गटातटाचे राजकारण करू नका. वाद, मतभेद टाळा. संघटना कार्यकर्त्यांच्या बळावर वाढते; पण काही कार्यकर्त्यांनी चुका केल्या, की इतरांना किंमत मोजावी लागते. पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांना कमीपणा येईल, असे वर्तन कार्यालयाची पायरी चढल्यानंतर किंवा इतर ठिकाणीही नको,’ अशी तंबी अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिली.
वाचा: राणेंच्या पेट्रोल पंपावरील शिवसेना-भाजप राड्यानंतर वैभव नाईकांवर गुन्हा दाखल