दुसऱ्या लाटेत रविवारी पहिल्यांदाच ‘या’ जिल्ह्यात शून्य मृत्यू; तब्बल ४ महिन्यांनी दिलासा

हायलाइट्स:

  • करोनामुळे रविवारी जळगाव जिल्ह्यात एकही बळी नाही
  • जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासा देणारी बाब
  • तब्बल ४ महिन्यांनी दिसलं दिलासादायक चित्र

जळगाव : जळगाव जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट उसळल्यानंतर रविवारी पहिल्यांदा करोनामुळे जिल्ह्यात एकही बळी (Jalgaon Coronavirus Updates) गेला नाही. यापूर्वी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी करोना बळींची संख्या शून्य इतकी नोंदवली गेली होती. त्यानंतर तब्बल ४ महिन्यांनी हे दिलासादायक आणि आशादायी चित्र समोर आलं आहे.

जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारीच्या अखेरीस करोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. एप्रिल आणि मे महिन्यात तर करोनाने अक्षरशः कहर माजवला होता. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र होती. या लाटेत वयोवृद्धांसह तरुणांच्या मृत्यूच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. या लाटेच्या काळात जिल्ह्यात एका दिवसाला सरासरी २२ रुग्णांचा मृत्यू होत होता. जसजशी लाट ओसरू लागली, तसतसे मृत्यूचे प्रमाणही कमी झाले होते.

रविवारी दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासा देणारी ठरली आहे.

रविवारी ४८ नवे करोना रुग्ण

जळगाव जिल्ह्यात रविवारी ४८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर ११७ रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४१ हजार ९३४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर १ लाख ३८ हजार ००१ रुग्णांनी करोनाला हरवलं आहे. जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या सध्या १३६५ इतकी आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २५६८ मृत्यू

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे २५६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील १३६१ जणांचे तर १२९७ को-मोर्बिड रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा मृत्यूदर १.८१ टक्के इतका आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ५७२ रुग्णांचे मृत्यू हे एकट्या जळगाव शहरात तर त्याखालोखाल ३३४ रुग्णांचे मृत्यू हे भुसावळ तालुक्यात नोंदवले गेले आहेत.

Source link

Jalgaonjalgaon corona cases updatejalgaon corona newsजळगावजळगाव करोना अपडेट
Comments (0)
Add Comment