शरद पवार दिल्लीत दाखल; विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटणार

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशातील विरोधकांची एकजूट व्हायला हवी या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे रविवारी नवी दिल्लीत दाखल झाले. नवी दिल्लीत देशभरातील समविचारी विरोधी पक्षांचे नेते येणार असून, त्यासाठी पवार हे दिल्लीत गेले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांकडून समजते.

मराठा आरक्षण आणि अन्य प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अलीकडे भेट झाली होती. त्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे पत्र राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. तथापि या घडामोडीचा आणि शरद पवार यांच्या दिल्ली भेटीचा सुतराम संबंध नाही. पवार हे दिल्लीभेटीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याची शक्यता नाही, असे पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या एका नेत्याने खासगीत सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी शरद पवार यांनी शिवसेनेचे कौतुक केले होते. शिवसेना शब्द पाळण्यात ठाम आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आणीबाणीच्या कालखंडातील भूमिकेची पवार यांनी आठवण करुन दिली होती. यामुळे शिवसेना भूमिका बदलतील असे राजकीय आडाखे कोणी बांधत असेल तर ते वेगळ्या नंदनवनात राहत आहेत, असे पवार त्यावेळी म्हणाले होते.

महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल. फक्त पाच वर्षे नाही तर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अधिक जोमाने एकत्र काम करुन सामान्य नागरिकांचे प्रभावीपणे देशात, राज्यात प्रतिनिधित्व करेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असे भाकीत पवार यांनी केलेले आहे. यामुळे भाजप विरोधातील समविचारी राजकीय पक्षांची मोट बांधण्यासाठी ते दिल्लीस गेल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे.

Source link

Maratha ReservationNarendra Modiopposition leadersSharad Pawarनवी दिल्लीविरोधी पक्षशरद पवार
Comments (0)
Add Comment