हायलाइट्स:
- महाराष्ट्र करोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर?
- करोना प्रादुर्भावाची दुसरी लाट ओसरली
- आज राज्यात केवळ ६ हजार २७० नव्या रुग्णांची नोंद, तब्बल १३ हजार ७५८ रुग्ण झाले बरे
मुंबई : दुसऱ्या लाटेत राज्यात करोना प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असून आज ६ हजार २७० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसंच तब्बल १३ हजार ७५८ रुग्ण (Maharashtra Corona Cases Today) बरे होऊन घरी परतले आहेत.
दुसऱ्या लाटेत विविध जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर करोनाचा विळखा आता हळूहळू सैल होताना पाहायला मिळत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.८९ टक्के एवढे झाले आहे. मात्र राज्यात आज ९४ जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे.
राज्यात आतापर्यंत किती जणांना करोनाची लागण?
करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला होता. परिणामी आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९६,६९,६९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,७९,०५१ (१५.०७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७१,६८५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४,४७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोणत्या भागात किती अॅक्टिव्ह रुग्ण?
करोना संसर्गाची साखळी तोडण्यात यश आल्याने आता अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबई, ठाण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जास्त आहे. राजधानी मुंबईत १८ हजार ५२९, ठाण्यात १३ हजार ६८१, पुण्यात १६ हजार ८२७, सांगलीत ९ हजार ४५४ आणि कोल्हापूरमध्ये ९ हजार ५९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन आकड्यांवर आली आहे.
दरम्यान, करोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असली तरीही अनलॉक प्रक्रियेनंतर सार्वजनिक स्थळांसह बाजारपेठांतील गर्दी वाढताना दिसत आहे. पहिल्या लाटेनंतरही अशीच गर्दी झाल्यामुळे दुसरी लाट जास्त तीव्रपणे महाराष्ट्रात धडकली होती. त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि इतर नियमांचं नागरिकांना काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. प्रशासनाकडूनही वारंवार याबाबतचं आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला नागरिक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.