हायलाइट्स:
- काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं समर्थन
- महाविकास आघाडी एका उद्देशानं, ती कायम राहील
- शिवसेनेच्या विचारसरणी परवडली, पण भाजप नको – चव्हाण
मुंबई: काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी माजी bमुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी स्वबळाच्या भाषेचं अप्रत्यक्षरित्या समर्थन केलं आहे. ‘काँग्रेसला राज्यात नंबर एकचा पक्ष व्हायची असेल तर त्यात चुकीचं काय?,’ असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग फसण्याच्या स्थितीत आहे असं वाटतं का, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी नकारार्थी उत्तर दिलं. ‘तसं अजिबात नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या उद्देशानं ही आघाडी स्थापन झाली आहे. भाजपनं राज्यात गोंधळ घातला होता यावर तिन्ही पक्षांचं एकमत आहे. त्यामुळं आघाडी कायम राहील,’ असं चव्हाण म्हणाले.
वाचा: शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेना नाही, कारण…
काँग्रेसच्या नंबर एक होण्याच्या महत्त्वाकांक्षेचं त्यांनी समर्थन केलं. ‘काँग्रेस राज्यात सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. एक नंबरवर जाण्याची इच्छा ठेवली तर त्यात वावगं काय? आणि आघाडीमध्ये सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळतं असं सूत्र आहे,’ असं चव्हाण म्हणाले.
शिवसेना परवडली, पण भाजप नको!
काँग्रेस आणि शिवसेनेच्या भिन्न विचारसरणीबद्दलही पृथ्वीराज चव्हाण यांनी आपलं मत मांडलं. ‘शिवसेना-काँग्रेसच्या आघाडीकडे प्रत्येक जण आपल्या कोनातून बघू शकतो. पण हे सरकार एका विशिष्ट उद्देशानं स्थापन झालं आहे. आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करू शकतो, पण भाजपला अजिबातच नाही,’ असं ते म्हणाले.
वाचा: ‘भाजपनं आमच्याही कुटुंबाला त्रास दिला होता, पण…’
राहुल गांधी यांच्या मनात शिवसेनेबद्दल साशंकता असल्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, ‘ते खरं नाही. या महाआघाडीचा निर्णय दिल्लीत झाला आहे. शिवसेनेच्या पार्श्वभूमीमुळं सुरुवातीला काही शंका होत्या. मात्र, आम्ही त्याबद्दल काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा केली होती. त्यांना काही गोष्टी पटवून दिल्या होत्या. त्यामुळं आता तो मुद्दा राहिलेला नाही.’