संभाजीराजेंचा निर्णय धुडकावत सकल मराठा समाज रस्त्यावर; कोल्हापुरात चक्काजाम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा, लाख मराठा , जय भवानी, जय शिवाजी… अशा जोरदार घोषणा देत सकल मराठा समाजाने कोल्हापुरात सकाळी चक्का जाम आंदोलन केले. ताराराणी चौकात झालेल्या या आंदोलनात आता मूक नाही तर ठोक मोर्चा निघतील असा निर्धारच व्यक्त करण्यात आला. तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली.

कोल्हापुरातून मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाला सुरुवात झाली. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले. सरकार बरोबर झालेल्या चर्चेत काही मागण्या मान्य केल्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आपले आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित केले. कालच त्यांनी तशी घोषणा केली. मात्र त्याला विरोध करत कोल्हापुरात मराठा क्रांती ठोक मोर्चा सुरुवात झाली आहे. विशेषता यामध्ये सकल मराठा समाजानेच पुढाकार घेतला आहे.

वाचा: ‘पवारांच्या प्रयत्नांचं स्वागतच; आम्हाला चिंता वाटण्याचं कारण नाही’

संभाजीराजे यांना सरकार फसवत आहे असा आरोप करत मूक नाही आता ठोक असा निर्धार करत कोल्हापुरातील मराठा सकल मराठा समाजाने उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. हे आंदोलन मागे घ्यावे म्हणून सोमवारी पोलिसांनी विनंती केली होती. मात्र, ही विनंती अमान्य करत सकाळी हे आंदोलन करण्यात आले.

सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या या आंदोलनास दहा वाजल्यापासूनच ताराराणी चौकाकडे जिल्हाभरातून सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांची रीघ लागली. भगवे झेंडे हातात घेऊन कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात चौकात आल्यानंतर आंदोलनास सुरुवात झाली. महिलांच्या बरोबरच लहान मुलेही आंदोलनात सहभागी झाले. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही, एक मराठा, लाख मराठा अशा घोषणांनी संपूर्ण ताराराणी चौक दुमदुमून गेला. सरकार मराठा आरक्षण देण्यात टाईमपास करत आहे, त्यामुळे आता उग्र आंदोलन करून सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू असा इशारा यावेळी देण्यात आला. २६ जून पर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्या लेखी स्वरुपात मान्य न केल्यास २६ जून नंतर कोल्हापूरातूनच उग्र आंदोलन सुरू केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

वाचा: ‘काँग्रेसला नंबर एकचा पक्ष व्हायचं असेल तर त्यात चुकीचं काय?’

यावेळी बोलताना समरजीत घाटगे म्हणाले, सरकार सध्या मराठा आरक्षणात टाईमपास करत आहे. युवकांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. त्यामुळे उगाच आश्वासन देत वेळ घालवण्यापेक्षा सरकारने आता तातडीने मागण्या मान्य करायला हवे. प्रा. जयंत पाटील म्हणाले, टोकाची भूमिका घेतल्याशिवाय सरकार आमच्या मागण्या मान्य करणार नाही. याची आम्हाला खात्री झाली आहे. म्हणूनच आता आम्ही राज्यभर उग्र आंदोलन करणार आहोत. त्याची सुरुवात कोल्हापुरात झाली आहे.

वाचा: शरद पवारांनी बोलावल्या बैठकीला शिवसेना नाही, कारण…

या आंदोलनात निवास साळोखे, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप पाटील, सचिन तोडकर, सुजित चव्हाण, रविकिरण इंगवले, महेश जाधव, दिलीप देसाई, स्वप्नील पार्टे, जयेश कदम यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला. तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे शहरात येणारी वाहतूक विस्कळीत झाली. सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यास चार दिवसानंतर ही ठिणगी राज्यभर पोहोचू असा इशारा यावेळी देण्यात आला.

Source link

Kolhapur Chakka Jam for Maratha ReservationMaratha Reservationsambhajiraje bhosaleकोल्हापूरमराठा आरक्षणसंभाजीराजेसकल मराठा समाज
Comments (0)
Add Comment