म. टा. खास प्रतिनिधी,नाशिकः राज्यातील निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी जिल्ह्याचे दौरे सुरू केले आहे. येत्या शनिवारी (दि. २६) पटोले नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत नाशिक, मालेगाव येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका होणार आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात गटबाजीत अडकलेल्या व सध्या अडगळीत पडलेल्या काँग्रेसला संजीवनी देण्याचे मोठे आव्हान पटोले समोर उभे ठाकले आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असल्याने काँग्रेसला राज्यात पक्षविस्ताराची संधी आहे. परंतु, काँग्रेस पदाधिकारी आणि मंत्र्यांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना न्याय दिला जात नसल्याचे चित्र आहे. त्यातच नाशिकमध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद जास्त आहे. दुसरीकडे, काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी आहे. शहर काँग्रेसमध्येच तीन ते चार गट आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचा शहराध्यक्षच चार ते पाच वर्षांपासून प्रभारी म्हणून काम करीत आहेत. ग्रामीणमध्येही गटबाजीमुळे पक्षाची वाताहत झाली आहे. नाशिकमधील काँग्रेसला उभारी देण्यासाठी माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस शहर व जिल्हा काँग्रेसची स्थिती वाईट झाली आहे. आता नवीन प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याकडून नाशिक काँग्रेसला संजीवनी मिळण्याची आशा आहे. त्याच पार्श्वभूमीवर पटोले यांच्या दौऱ्याकडे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. पटोले २६ तारखेला नाशिक शहरासह जिल्ह्यात तालुकास्तरावर बैठका घेणार आहेत. या दौऱ्यात पटोले पक्षातील वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. मालेगाव येथून पटोले आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार असून तालुका स्तरावरील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या नाशिकच्या दौऱ्याकडे पक्ष कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
स्वबळाच्या निर्णयावर माघार नाही; काँग्रेसचा मित्र पक्षांना थेट संदेश
नियोजनासाठी बैठक
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या २६ तारखेच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. २२) काँग्रेसची बैठक झाली. यात दौरा यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी आमदार हिरामण खोसकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, माजी आमदार शिरीष कोतवाल आदींनी मार्गदर्शन केले. संपतराव सकाळे, रमेश कहांडोळे, दिगंबर गिते, संदीप गुळवे, ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते.
… असा असणार दौरा
सकाळी ११ : धुळ्याहून मालेगाव आगमन. मालेगाव, सटाणा, कळवण, नांदगाव येथील शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळावा होईल. त्यानंतर मालेगाव शहर काँग्रेसची बैठक.
दुपारी १२ : चांदवड येथे चांदवड, येवला, देवळा येथील शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळावा.
दुपारी २.३० : पिंपळगाव येथे निफाड, सिन्नर, पेठ, सुरगाणा व दिंडोरी येथील काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी मेळावा.
सायंकाळी ४ : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, पत्रकारांशी देखील संवाद.
सायंकाळी ६.३० : तुपसाखरे लॉन्स येथे नाशिक, इगतपुरी त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी व कार्यकर्त्यांशी संवाद.
रात्री : नाशिकमधील पदाधिकाऱ्यांशी चर्चा.