हायलाइट्स:
- नाना पटोलेंची मोदींवर पुन्हा घणाघाती टीका
- करोना प्रादुर्भाव, खाद्यतेलाचे वाढलेले भाव…या मुद्द्यांवरून साधला निशाणा
- करोना हे मानवनिर्मित संकट असल्याचाही आरोप
जळगाव : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर आक्रमक शब्दांत निशाणा (Congress Nana Patole Criticizes Modi Government) साधला आहे. ‘संपूर्ण जगात करोना संकट असताना देशात हवी ती काळजी घेण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले. त्यातच करोनाचे संकटात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना दिवे लावायला, ताट वाजायला लावून यांनी देशात अवदशा आणली,’ अशा शब्दांत आज जळगावात नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं.
नाना पटोले हे आज बुधवारी जळगाव जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते. या दरम्यान डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी काँग्रेसच्या कोविड योद्ध्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे, राज्याचे प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी मंत्री शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, माजी प्रदेश सचिव डी.जी.पाटील, जी.प.गटनेते प्रभाकर सोनवणे, शहर प्रभारी अश्विनी बोरस्ते यांच्यासह कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांची सेवा करणाऱ्या काँग्रेसच्या व वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड योद्धांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी केले. सुरुवातीला केंद्र शासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरण्यासाठी लागू केलेल्या कृषी कायद्याचे प्रतिकात्मक होळी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आले.
‘करोना हे मानवनिर्मित संकट’
अपल्या देशात आलेला कोविड आजार हे मानवनिर्मित संकट आहे. यामागे जागतिक कटकारस्थान आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाबलीपूरम येथे बैठक झाल्यानंतरच जगात करोनाचा प्रसार झाला असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. डिसेंबर २०१९ मध्येच जागतिक आरोग्य संघटनेने भारताला विदेशातील सर्व प्रवासी वाहतूक रोखण्याचे आदेश दिले होते. मात्र, नरेंद्र मोदी यांनी दुर्लक्ष केल्यानेच देशात करोना वाढल्याचेही नाना पटोले म्हणाले.
सध्या खाद्यतेलाचे भाव वाढत असून, तेलाचे भाव वाढविण्यामागे अडाणी यांचा फायदा करण्याचा डाव केंद्र शासनाचा असल्याचाही आरोप यावेळी पटोले यांनी केला. देशातील नागरिकांच्या मृत्यूचा सौदा करणारे नरेंद्र मोदी हे जागातील पहिलेच पंतप्रधान असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.
पंतप्रधान मोदी हे तर यमदूत – आ. प्रणिती शिंदे
काँग्रेसचे कार्यकर्ते हे करोनाकाळात नागरिकांना मदत करून, देवदुतासारखे काम करत असताना मोदी यांनी यमदूत बनून देशातील नागरिकांना मरण्यासाठी सोडून दिल्याची जोरदार टीका महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी यावेळी बोलताना केली.