हायलाइट्स:
- प्रसिद्ध व्यावसायिक नानासाहेब गायकवाड आणि मुलावर गुन्हा दाखल
- गणेश गायकवाड हा महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस
- सुरक्षा रक्षकास शिवीगाळ, मारहाण करून दहशत निर्माण केल्याचा आरोप
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक नानासाहेब गायकवाड, त्यांचे चिरंजीव प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस केदार उर्फ गणेश गायकवाड यांच्यासह आणखी तिघांवर सांगवी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे निलख येथे सुरू असलेल्या बांधकाम साईटवर बांधकाम करण्यासाठी गेलेल्या कामगारांना दमदाटी करून, सुरक्षा रक्षकास मारहाण करून आरोपींनी काम बंद पाडले.
इतकंच नाहीतर साहित्य जबरदस्तीने नेऊन, दहशत निर्माण केली. धक्कादायक म्हणजे आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देऊन पिस्तूलातून १० वेळा गोळीबार करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, या घटना १७ जानेवारी २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान पिंपळे निळख येथे घडल्या आहेत.
याबाबत २४ जून २०२१ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. अजिंक्य विठ्ठल काळभोर (४५, रा. तुळजाई वस्ती, काळभोरनगर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, नानासाहेब गायकवाड (रा. औंध), केदार उर्फ गणेश गायकवाड (रा.औंध), गणेश साठे, राजा आणि त्यांचे २ ते ३ साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपी गणेश गायकवाड हा महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहे. दरम्यान, तक्रारदार गुन्हा दाखल करण्यास घाबरत असल्याने गुन्हा उशिराने दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळभोर यांनी त्यांच्या पिंपळे निलख येथील जागेवर बांधकाम करण्यासाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत. या जागेवर ले-आउट करण्यासाठी कामगार आणि ठेकेदार यांच्यासह ते त्या जागेवर गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली. चालू असणारे काम बंद पाडले. त्या जागेवर करण्यात आलेली संरक्षण भिंत, कंपाउंड, लोखंडी पोल, पाण्याची टाकी व इतर साहित्य असे ४८ हजार रुपयांचे साहित्य जबरदस्तीने काढून नेले.
सुरक्षा रक्षकास शिवीगाळ, मारहाण करून दहशत निर्माण केली. पुन्हा या ठिकाणी आल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच १० वेळा फायरिंग करेल, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर तपास करत आहेत.