हायलाइट्स:
- देवेंद्र फडणवीस घेणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट
- अनुप मंडळावर बंदी आणण्यासाठी करणार प्रयत्न
- जैन समाजाच्या मागणीनंतर दिलं आश्वासन
कोल्हापूर : अनुप मंडळाच्या भूमिकेवर नाराज असलेल्या जैन समाजातील शिष्टमंडळाने भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis) यांची भेट घेऊन त्यांना निवदेन दिलं. त्यानंतर फडणवीस यांनीही जैन संघटनेच्या भूमिकेला समर्थन देत या मुद्द्यावरून अमित शहांची भेट घेणार असल्याचं स्पष्ट केलं. ‘अनुप मंडळाच्या धर्मविरोधी कारवाया अजिबात सहन केल्या जाऊ शकत नाहीत. जैन धर्म आणि हिंदू धर्मासंदर्भात चालत असलेला अपप्रचार तात्काळ थांबणे आवश्यक आहे, त्यासाठी या राष्ट्रदोही संघटनेवर देशभरात बंदी घालण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन,’ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय जैन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिलं आहे.
‘या कामासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जैन समाजाच्या शिष्टमंडळाच्या समवेत भेट घेऊन आपण तातडीने पुढील कारवाई करण्यास त्यांना विनंती करू,’ असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रीय जैन संघटनेने संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे स्थानिक प्रशासकीय अधिकार्यांच्या मार्फत ५०० हून अधिक ठिकाणी निवेदन देण्याचे आंदोलन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी ललित गांधी यांच्या नेतृत्वात आमदार मंगलप्रभात लोढा व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्यासमवेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या शिष्टमंडळात संदीप भंडारी डी.सी सोळंकी, महेंद्र जैन, रिषभ मारू आदी जैन समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘निवेदन प्रस्तुतीकरणाच्या राष्ट्रीय आंदोलनाला संपूर्ण भारतात चांगला प्रतिसाद मिळाला असून नागालैंड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपुर, मेघालय, यासारखी पूर्वोत्तर राज्ये, केरळ, गोवा सारखी दक्षिणी राज्ये ,तसेच जम्मू कश्मीर, उड़ीसा असे जैन समाजाची कमी संख्या असलेल्या राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, झारखंड, बिहार अशा बहुसंख्याक जैन समाज असलेल्या राज्यांमध्ये सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत एकून ५२९ ठिकाणी निवेदन देण्यात आलेली आहेत आणि कार्यक्रम यापुढेही ३० जून पर्यंत असाच चालू राहणार आहे,’ अशी माहितीही राष्ट्रीय जैन संघटनेचे समन्वयक ललित गांधी आणि अतुल शहा यांनी दिली.