ईडी, सीबीआयचा ससेमिरा; संजय राऊत भडकून म्हणाले, आम्हीही बघून घेऊ!

हायलाइट्स:

  • ईडी, सीबीआयच्या चौकशांमुळं महाविकास आघाडीत अस्वस्थता
  • नैराश्यातून तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप
  • संजय राऊत यांनी भाजपला दिला अप्रत्यक्ष इशारा

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीचे नेते व मंत्र्यांच्या मागे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. केंद्रातील भाजप सरकार जाणीवपूर्वक विरोधकांना त्रास देत असल्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र, विरोधकांच्या आरोपांनंतरही ईडी, सीबीआयचे छापे सुरूच आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरी दुसऱ्यांदा छापे टाकण्यात आले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वाचा: स्वीय सचिवांच्या अटकेनंतर अनिल देशमुखांना ईडीकडून समन्स

‘राज्यात सरकार बनवता न आल्यामुळं काही लोकांना नैराश्य आलं आहे. त्यातूनच महाविकास आघाडीच्या लोकांना त्रास दिला जातोय. हे सगळं आमच्यासाठी नवीन नाही आणि आम्हाला त्याची चिंताही नाही,’ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच म्हटलं होतं. मुंबईत आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी पवारांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. ‘राज्यातील नेते, मंत्र्यांवर काही आरोप असतील तर राज्यातील तपास यंत्रणा चौकशी करण्यास सक्षम आहे हे आम्ही वारंवार सांगत आलोय. पण महाराष्ट्रातील मंत्र्यांना, मग ते शिवसेनेचे असोत राष्ट्रवादीचे असोत की काँग्रेसचे, त्यांना ठरवून त्रास दिला जात आहे. पण आम्ही बघून घेऊ,’ असं राऊत म्हणाले.

वाचा: अनिल देशमुखांच्या घरी ईडीचे छापे; शरद पवार म्हणाले…

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर काही दिवसांपूर्वी ईडीनं अनिल देशमुख यांच्या घरी छापे टाकले होते. काल पुन्हा एकदा तशीच कारवाई करण्यात आली. देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांनाही अटक करण्यात आली आहे. तसंच, देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचीही सध्या ईडी चौकशी सुरू आहे. तर, खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी झाली आहे.

वाचा: संपूर्ण राज्य आता तिसऱ्या टप्प्यात; काय बंद, काय सुरू राहणार?

Source link

anil deshmukhSanjay RautSanjay Raut on ED CBI Inquiryअनिल देशमुखपरमबीर सिंगशरद पवारसंजय राऊत
Comments (0)
Add Comment