हायलाइट्स:
- नगरमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारण जोरात
- महाविकास आघाडीमध्ये फूट; राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र, काँग्रेस विरोधात
- काँग्रेसचा उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता
अहमदनगर: राज्यात महाविकास आघाडीच्या सहकारी पक्षांमध्ये धुसफूस सुरू असताना नगरमध्ये मात्र उघड फूट पडली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आहेत. महापौरपद शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला असून उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे राहणार आहे. आज महापौरपदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण प्रक्रियेत काँग्रेसला सुरुवातीपासूनच दूर ठेवण्यात आले आहे. त्यातच काँग्रेसनेही आज महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज नेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.
अहमदनगरच्या महापौरपदासाठी ३० जूनला ऑनलाइन पद्धतीने निवडणूक होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली. शिवसेनेतर्फे रोहिणी शेंडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, अविनाश घुले, विनीत पाऊलबुधे, कुमार वाकळे, संपत बारस्कर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, गिरीष जाधव, विक्रम राठोड, दिलीप सातपुते, संभाजी कदम उपस्थित होते. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकत्र आल्याचे दिसून आले. शेंडगे या महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, यावेळी काँग्रेसचे कोणीही उपस्थित नव्हते. उलट काँग्रेसने सर्वात आधी जाहीर केलेल्या उमेदवार शीला चव्हाण यांच्यासाठी महापौरपदाचे उमेदवारी अर्ज नेण्यात आले आहेत.
वाचा:सुप्रिया सुळे यांच्या समोरच ‘अजित पवार मुर्दाबाद’च्या घोषणा
या निवडणुकीसाठी भाजपकडे पात्र उमेदवार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत निवडणूक लढविण्याचा निर्णय मुंबईत घेण्यात आला होता. जास्त जागा असल्याने महापौरपद शिवसेनेला तर उपमहापौरपद राष्ट्रवादीला असे वाटप करण्यात आले आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेत काँग्रेसला दूर ठेवण्यात आले. बैठका आणि अर्ज भरण्याच्या वेळीही काँग्रेसचे कोणी हजर नव्हते. अर्थात पक्षीय बलाबल पहाता काँग्रेसला शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांची मदत घेतल्याशिवाय काहीही करता येऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. तरीही काँग्रेस उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार की, निवडणूक बिनविरोध होऊ देणार, याची उत्सुकता आहे.
वाचा: ‘आम्ही फडणवीसांना राजकीय संन्यास घेऊ देणार नाही, त्यांचं मन वळवू’
गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपचा महापौर झाला होता. यावेळी भाजपकडे उमेदवार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. शिवाय राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरही मागणी केली जात होती. याचवेळी काँग्रेसमध्ये बदल होऊन शहर जिल्हाध्यक्षपदी किरण काळे यांची नियुक्ती झाली. काळे यांनी सुरुवातीपासूनच महापालिकेतील भाजप आणि सोबतच राट्रवादीला टार्गेट करून अनेक आंदोलनेही केली. आमदार जगताप यांच्यावरही त्यांनी सातत्याने टीका केली. महापौरपदासाठी सर्वप्रथम काळे यांनीच काँग्रेसचा उमेदवार जाहीर केला. याचा राग जगताप यांच्या डोक्यात असल्याने त्यांनी शिवसेनेशी जुळवून घेताना काँग्रेसला जाणीवपूर्वक दूर ठेवल्याचे दिसून येते. त्यामुळे आगामी काळातही काँग्रेसला विरोधी पक्षाचीच भूमिका बजावण्याची वेळ येऊ शकते. सेना- राष्ट्रवादी एकत्र आले आहेत, तर भाजप-राष्ट्रवादी पूर्वीचे मित्र पक्ष आहेत. त्यामुळे भविष्यात काँग्रेस हा नगरच्या महापालिकेत विरोधी पक्ष राहण्याची शक्यता आहे. अर्थात अधिकृतपणे विरोधीपक्ष नेतापद भाजपकडे दिले जाऊ शकते. पूर्वी शिवसेना विरोधात असताना सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीला टार्गेट करीत असे. आता ही भूमिका भाजप कशी पार पाडणार, याकडेही लक्ष लागले आहे.
वाचा: व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवताना सावधान! पुण्यात एकाला अटक