मंत्रीच घोषणा देऊ लागले, हे पाहून आंदोलक गडबडले आणि…

हायलाइट्स:

  • हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ
  • संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या मराठा आरक्षणासाठी घोषणा
  • हसन मुश्रीफ यांनीही घोषणा देत दिली आंदोलकांना साथ

कोल्हापूर: कोल्हापुरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची पत्रकार बैठक सुरू होती, त्यावेळी अचानक संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आत घुसले, त्यांनी ‘मराठा आरक्षण आमच्या हक्काचे… आरक्षण द्या…’ अशा घोषणा सुरू केल्या. मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू होताच स्वत: मुश्रीफही मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देऊ लागले आणि आंदोलकांना शांत बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. (Hasan Mushrif Shouts Slogan for Maratha Reservation)

कोल्हापुरात सर्किट हाऊस येथे दुपारी मंत्री मुश्रीफ यांची पत्रकार बैठक सुरू होती. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याविषयी ते पत्रकारांना माहिती देत होते. तेवढ्यात संभाजी ब्रिगडेचे दहा बारा कार्यकर्ते सभागृहात घुसले. त्यांनी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा देत त्यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. तेव्हा तेथे एकच पोलिस उपस्थित होता. दहा बारा कार्यकर्ते मंत्र्यांच्या दिशेने जात असल्याचे पाहून तोही गोंधळला. वातावरण एकदम तणावपूर्ण झाले.

वाचा: साखर कारखान्यांची विक्री; अण्णा हजारेंचे खळबळजनक आरोप

कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी प्रसंगावधान राखत स्वत:च मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षणासाठी चलो दिल्ली.. अशा घोषणा सुरू केल्या. ज्या मागण्यासाठी मंत्र्यांच्या विरोधात आपण घोषणा देत आहोत, तेच मंत्री घोषणा देत आंदोलनात सहभागी झाल्याने कार्यकर्तेही थोडा वेळ गोंधळले. काय करावे त्यांनाही कळेना. ‘या इकडे’ असं म्हणत मंत्र्यांनी त्यांना व्यासपीठावरच बसवले. तुमची जी मागणी आहे, तीच आमची आहे, दोघे मिळून केंद्र सरकारकडे दाद मागू, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत केले.

वाचा: घोटाळा झाला म्हणता ना? मग काय झाला ते सांगा: अजित पवार

कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांना निवेदन दिले. येत्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र सरकारने राज्यातील मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना राहिला नाही. बालिश विधाने करत भाजप सरकार दिशाभूल करत आहे. यामुळे आता समाजाला न्याय देण्यासाठी ‘चलो दिल्ली’चा नारा देणे आवश्यक आहे.

वाचा: रोहित पवारांनीही कारखाना लाटल्याचा आरोप; भाजपची चौकशीची मागणी

Source link

Hasan MushrifKolhapurMaratha Reservationsambhaji brigadeकोल्हापूरमराठा आरक्षणसंभाजी ब्रिगेडहसन मुश्रीफ
Comments (0)
Add Comment