कर्जत, दि.२२ :- ‘रात्री घराच्या पडवीत आपल्या पतीसोबत झोपलेल्या महिलेच्या शेजारी तिच्याच घरापाठीमागे राहत असलेल्या एका इसमाने झोपून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस कर्जत पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच अटक करून त्याच्याविरुद्ध तीन दिवसातच दोषारोपपत्रही दाखल केले आहे.महेश चिपळूणकर(बदलेले नाव) वय-२९ रा. कर्जत असे या आरोपीचे नाव आहे. दि.१७ फेब्रुवारी रोजी पीडित महिला आपल्या राहत्या घराच्या पडवीमध्ये रात्री आपल्या पतीसोबत झोपली असताना त्यांच्याच घरापाठीमागे राहत असलेला आरोपी (रात्री ११ वाजता) या महिलेच्या शेजारी येऊन झोपला व त्याने वाईट उद्देशाने तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे कर्जत येथील फिर्यादीचे फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात भादवी कलम ३५४,३५४(ब) कलमांतर्गत दिनांक १८.२.२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपीस काही तासांमध्येच गजाआड केले असून सखोल तपास करून आरोपीच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे.गुन्हा घडल्यावर आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर काही दिवसातच दोषारोपपत्र दाखल केले जात आहे त्यामुळे अनेकांना लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जात आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पो हवा सुनील माळशिखरे, पोलीस नाईक बी. जी. यमगर, पो.हे.कॉ.एम जी काळे, विकास चंदन आदींनी केली आहे.
महिलांनी न घाबरता थेट तक्रारी द्याव्यात
कर्जत तालुक्यातील महिलांना त्रास देणारा कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही. महिलांनी बिनधास्तपणे तक्रारी दाखल कराव्यात. कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तक्रारदार महिलेचे नावही गोपनीय ठेवले जाईल..