भारत निवडणूक आयोगाची मतदार जागृती स्पर्धा सहभाग घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन

पुणे, दि. २२: भारत निवडणूक आयोगाने २०२२ च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे. स्पर्धांसाठी १५ मार्च २०२२ पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे. ‘स्वीप’ कार्यक्रमाअंतर्गत ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत ५ प्रकारच्या स्पर्धा होत आहेत. यामध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तीचित्र स्पर्धांचा समावेश आहे.व्हिडिओ, गाणे आणि घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रवेशिका भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीनुसार कोणत्याही अधिकृत भाषेत दिल्या जाऊ शकतात.संस्थात्मक श्रेणी, व्यावसायिक श्रेणी आणि हौशी श्रेणी अशा तीन श्रेणींमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे. संस्थात्मक श्रेणीमध्ये शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा केंद्र किंवा राज्य सरकारच्या संबंधित कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थांना या संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल. व्यावसायिक श्रेणीमध्ये गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र किंवा यासंबधी एखादे काम हा ज्या व्यक्तीचा उदरनिर्वाहाचा मुख्य स्त्रोत आहे अशी व्यक्ती व्यावसायिक म्हणून गणली जाईल. निवड झाल्यास, सहभागी स्पर्धकाला व्यावसायिक श्रेणी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.हौशी श्रेणीमध्ये व्यक्ती गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र हा छंद म्हणून, सृजनाची आस म्हणून करते, परंतु तिच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत इतर कोणत्या तरी माध्यमांतून असतो तिला ‘हौशी’ म्हणून गणण्यात येईल. स्पर्धेसाठी तिन्ही गटात पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.स्पर्धकांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळhttps://ecisveep.nic.in/contest/ येथे भेट द्यावी. प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci.gov.in इथे ईमेल कराव्यात. ईमेल करतांना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. सर्व प्रवेशिका १५ मार्च २०२२ पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशीलांसह voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठवण्यात याव्या, असेही आवाहन जिल्हा निवडणूक शाखेतर्फे करण्यात आले आहे

Comments (0)
Add Comment