खबरदार! पोलीस ठाण्यात गुटखा खाऊन आल्यास ‘दंडाच

कर्जत पोलीस ठाण्याच्या स्वच्छतेबाबत पोलीस निरीक्षकांचे ‘नो कॉम्प्रोमाईज’

कर्जत दि.२५:- ‘आपले घर आपण कायमच स्वच्छ ठेवतो, पालापाचोळा,घाण,कचऱ्याचा नायनाट करतो. गुटखा खाऊन आपल्याच घराच्या आवारात पिचकाऱ्या मारण्यास तर कुणाला थाराच नसतो मग, शासकीय कार्यालयांनाच आपण घरासारखे स्वच्छ का ठेऊ शकत नाही? कर्जत पोलीस ठाण्याचे कृतिशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मात्र ही संकल्पना केवळ बोलण्यातच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतही उतरवली आहे. पोलीस ठाण्यात गुटखा खाऊन येणाऱ्यांना चक्क ‘२०० रुपये दंडाची पावती फाडा व मगच कामाचे बोला’ असा नियम लागु केला आहे. पोलीस निरीक्षकांचा हा ‘यादव पॅटर्न’ पोलीस ठाणे व परिसर स्वच्छ ठेवण्यास आता चांगलाच उपायकारक ठरत आहे.पोलीस ठाण्याची इमारत व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी येथील सर्वच पोलीस बांधव प्रयत्नशील असतात. ‘तालुक्याला शिस्त लावताना आपले पोलीस ठाणेही तेवढेच शिस्तप्रिय असावे’ असा ध्यास घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव,पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच येथील सर्वच अधिकारी कर्मचारी-वर्गाने या पोलीस ठाण्याचा कायापालट केला आहे.पोलीस ठाण्याच्या सुसज्ज इमारतीला शोभेल अशी परिसरात केलेली देशी-विदेशी समान अंतरावर केलेली वृक्ष लागवड,चौफेर लावलेली सर्वांना आकर्षित करणारी रंगीबेरंगी फुलझाडे, स्वच्छता व टापटीप, नागरिकांना बसण्यासाठी बाकांची सुविधा, अद्ययावत गुन्हे रेकॉर्ड, गुन्ह्यांचे जलद तपास,अधिकारी कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी असलेला सु-संवाद,पोलीस ठाणे परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा,डिजिटल माहिती फलक, दुचाकी चारचाकी वाहनांची नायलॉन दोरीत करण्यात आलेली पार्किंग आदींमुळे हे पोलीस ठाणे आता ‘बेस्ट पोलीस स्टेशन’ म्हणुन नावारूपाला आले आहे. सध्या हे पोलीस ठाणे झाडांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही झाडे जगवण्यासाठी प्रत्येक झाडाला सुबकतेने आळे करून ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय या झाडांची नियमितपणे देखरेख केली जात आहे.त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसराला जणू ‘गार्डनचे’ स्वरूप आल्याचे चित्र पहावयास मिळते. आपल्या समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला हा नजारा पाहून क्षणभर का होईना मनाला समाधान वाटते.पोलीस ठाण्यात जाताना भीतीने दबकत जाणारे नागरिक पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे समाधान व्यक्त करत आहेत.त्यामुळे नावारूपाला आलेल्या या पोलीस ठाण्याची ‘सर्वोत्तम पोलीस ठाणे’ म्हणून निवड झाली तर कुणाला वावगे वाटू नये.

मुलींना घडवली पोलीस ठाण्याची सहल!

पोलीस स्टेशन म्हटलं की मुलींना भीती वाटते. कुणी त्रास दिला,छेडछाड केली तर त्या तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. मात्र त्यांची ही भीती नाहीशी होऊन त्या निर्भयी बनाव्यात यासाठी तक्रार कुठे करावी?पोलीस ठाण्याचा कारभार नेमका कसा चालतो?कोणत्या कलमांतर्गत कारवाई होऊ शकते? याची सविस्तर माहिती मुलींना मिळण्यासाठी चक्क पोलीस ठाण्याची सहल घडवणारे हे जिल्ह्यातील पहिलेच पोलीस ठाणे आहे.

Comments (0)
Add Comment