हायलाइट्स:
- पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात
- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जोरदार खडाजंगी
- सत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्की
मुंबईः विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गोंधळ झाला असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक- सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं बोललं जात आहे. ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डेटा मागवण्याबाबत ठराव मांडण्यात आला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ हा ठराव मांडत असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने राज्य सरकारला उपलब्ध करुन द्यावा, असा ठराव आज सरकारकडून विधानसभेत मांडण्यात आला. त्यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका घेतली. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनीहा ठराव मंजुरीसाठी टाकला असता विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. या गोंधळातच हा ठराव मंजूर करण्यात आला.
वाचाः ओबीसी आरक्षण: विधानसभेत झाला ‘हा’ महत्त्वाचा ठराव
विधानसभा स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विरोधी आमदार व सत्ताधारी आमदार यांच्यात धक्काबुक्की झाली. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनीही विरोधी आमदारांनी धक्काबुक्की करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात बोलू दिलं नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी तालिका अध्यक्षांवर दबाव टाकणाऱ्या आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
वाचाः MPSCच्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार; अजित पवार यांची घोषणा
या अभूतपूर्व गोंधळामुळं विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं. मात्र, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात कोणत्याप्रकारची धक्काबुक्की झाली नाही. मी तिथे उपस्थित होतो, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.