आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत जे काही घडले ते जेव्हा मी ऐकले तेव्हा महाराष्ट्रात असे घडू शकते का, यावर माझा विश्वासच बसत नाही. सत्ता एके सत्ता हाच जर अट्टाहास असेल तर सगळेच मग वाईट चालले आहे, असे म्हणावे लागेल. हे सर्व जबाबदार पक्षाकडून घडल्याचे सांगत त्यांनी विरोधी पक्षाकडे बोट दाखवले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विधानसभेत ओबीसी समाजाबाबत ठराव मांडण्यात आला होता. त्यावर तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते बोलावे, काही वेडेवाकडे करण्याची आवश्यकता नव्हती. सभागृहात समोर माईक असताना देखील बेंबीच्या देठापर्यंत ओरडण्याची काहीच गरज नाही. वेडेवाकडे काही तरी करायते आरडाओरड करायची ही लक्षणे काही लोकशाहीची नाहीत. राजदंड पळवणे ही काय पद्धत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोले लगावले आहेत.
पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे होते. या दोन दिवसांमध्ये जनतेला समाधान मिळेल, असे काम केले आहे, असे सांगतानाच अधिवेशनातील कामकाजाला दर्जा मात्र खालावला चालला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ज्यांच्याकडून हे घडले त्यांनी त्यात लवकरात लवकर सुधारणा करावी अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
बोगस लसीकरणाचा तपास केला जाईल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोगस लसीकरणावरही भाष्य केले. ज्यांनी लस घेतली आहे अशांनाही करोनाचा संसर्ग होत आहे, असे सांगताना बोगस लसीकरणाच्या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. ज्या लोकांना बोगस लस देण्यात आली आहे, अशांचीही तपासणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले.