हायलाइट्स:
- जामिनाच्या प्रतीक्षेतच स्टॅन स्वामींचं निधन
- इतर १० आरोपींनी तुरुंगात केलं लाक्षणिक उपोषण
- उपोषण करत नोंदवला यंत्रणेचा निषेध
मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील सर्वाधिक वयाचे आरोपी स्टॅन स्वामी (८४) यांचं नुकतंच निधन झालं. स्टॅन स्वामी यांचा जामिनाच्या प्रतीक्षेत न्यायालयीन कोठडीतच मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ कोरेगाव-भीमा हिंसाचार व माओवाद्यांशी कथित संबंध असल्याच्या आरोप प्रकरणातील १० आरोपींनी आज नवी मुंबईतील तळोजा तुरुंगातच एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं.
कोरेगाव भीमा इथं झालेल्या हिंसाचारानंतर एल्गार परिषदेतील अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. स्टॅन स्वामी यांचाही त्यामध्ये समावेश होता. मात्र त्यांचं वय आणि प्रकृती पाहता त्यांना जामीन देण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. मात्र त्यांना जामीन मिळू शकला नाही आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जामिनाच्या प्रतीक्षेतच त्यांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणात अटकेत असलेल्या इतर १० जणांनी तुरुंगात उपोषण करत निषेध नोंदवला.
दरम्यान, ‘स्टॅन स्वामी यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न केले, उपचार केले,’ अशी माहिती स्वामी यांच्या निधनानंतर वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयाचे डॉ. डिसूझा यांच्याकडून मुंबई हायकोर्टाला देण्यात आली होती.
स्वामी यांना नक्की कोणता आजार होता?
‘स्टॅन स्वामी यांना कल्मनरी इन्फेक्शन झाले होते. त्याशिवाय न्यूमोनियाही झाला होता. तसंच पार्किन्सन्सचा त्यांचा आजार जुनाच होता,’ अशी माहिती होली फॅमिली रुग्णालयाचे डॉक्टर इयान डिसूझा यांनी दिली होती.