हायलाइट्स:
- मराठा आरक्षणावरुन राजकारण तापलं
- भाजप विरुद्ध सत्ताधारी
- अजित पवारांवर साधला निशाणा
मुंबईः पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार व चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर भाजपचे नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी सरकार पडण्याचं वक्तव्य केल्यानंतर अजित पवारांनी पाटलांवर पलटवार केला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना पहाटेच्या शपथविधी सोहळ्याची आठवण करुन देत निशाणा साधला होता. आता या प्रकरणात निलेश राणे यांनीही अजित पवारांवर टीका केली आहे.
वाचाः हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीनं थोपवली करोनाची दुसरी लाट
‘अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करु नये. मराठ्यांचा अपमान करु नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा,’ असा खोचक टोला निलेश राणेंनी पवारांना लगावला आहे.
अजित पवार काय म्हणाले?
५४ आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्राचा संदर्भ पाटील यांनी दिल्यानंतर त्याला आता १४ महिने झाले आहेत. काहींना जुन्या गोष्टी उकरून काढायची सवय आहे, असे अजित पवार म्हणाले होते. ज्यांना काम नाही ते नको त्या गोष्टी बोलतात. सध्या आनंदाचे वातावरण सुरू आहे. त्याकडे लक्ष दिले पाहिजे. करोनाच्या साथीकडे लक्ष देणे गरजेचे आहे,’ असे सांगून चंद्रकांत पाटील यांना अजित पवार यांनी टोला लगावला होता.
वाचाः लोक ऑफिसला जाणार कसे? मुंबईतील निर्बंधांवरुन काँग्रेस नेत्याचा सरकारला सवाल