हायलाइट्स:
- प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी
- आंबेडकरांची प्रकृती स्थिर
- तीन महिने पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहणार
मुंबईः वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांच्यावर गुरुवारी तातडीने बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. वंचितच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रकाश आंबेडकर हे सध्या आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्तिगत कारणांसाठी पक्षाच्या कार्यक्रमांपासून पुढील तीन महिने दूर राहणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तीन महिन्यांच्या कार्यकाळात पक्षाचे कार्यक्रम सुरू राहावेत यासाठी रेखा ठाकूर यांची पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. प्रकाश आंबेडकरांनी तीन महिन्यांच्या सुट्टीची घोषणा केल्यानंतर अनेक तर्क- वितर्क लढवण्यात येत होते. आता. मात्र, त्याचे खरे कारण समोर आलं आहे.
आज सकाळी रेखा ठाकूर यांनी एक पत्रक जारी करुन प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यावर ८ जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरांनी कळवलं आहे. अजून काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल, असं रेखा ठाकूर यांनी म्हटलं आहे.
कमालच झाली! विहिरीत बुडालेल्या कारच्या बदल्यात मिळाली नवी कोरी कार
दरम्यान, माझ्या व्यक्तिगत कारणासाठी पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमातून तीन महिन्यासाठी कार्यरत राहणार नाही. पक्ष चालला पाहिजे. आपण आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये निवडणुका आहेत. म्हणून पक्षाला अध्यक्ष असणे महत्वाचे आहे, असे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी प्रभारी म्हणून रेखा ठाकूर यांची नियुक्त करण्यात येत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं होतं. पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनी रेखा ठाकूर यांना सहकार्य करून पक्षाचे कार्यक्रम राबवावेत, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले होतं.
मुंबई, ठाण्यात लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक; लशीचा साठा संपला