पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर बसवणार; शिवसेनेचं राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष आव्हान

हायलाइट्स:

  • शिवसेनेकडून पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची तयारी सुरू
  • खासदार संजय राऊत यांनी घेतला पदाधिकाऱ्यांचा मेळावा
  • पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर बसवण्याचा निर्धार

म. टा. प्रतिनिधी । पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीत शिवसेनेचे ५० नगरसेवक निवडून येणार असून महापालिकेत महापौरही सेनेचाच होणार, असे भाकीत करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या ‘मिशन ५०’ ची घोषणा केली. तसेच सन्मानाने जागा वाटप झाले तरच आघाडी करणार, असे स्पष्ट करत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे स्वबळाची घोषणा केली. ५६ आमदारांच्या जोरावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होतो, तर ५० नगरसेवकांवर नक्कीच सेनेचा महापौर होणार, असे सांगत महापौरपदासाठीची रणनीतीही त्यांनी स्पष्ट केली. (Sanjay Raut on Pimpri Chinchwad Municipal Election)

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी तीनही विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी महापालिकेतील भ्रष्टाचार, निवडणुकीतील आघाडी, जागा वाटप याबाबत शिवसेनेची भूमिका मांडली. खासदार श्रीरंग बारणे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार, उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, राज्य संघटक गोविंद घोळवे, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते.

वाचा: कसलं पुनर्वसन? मी काही पूरग्रस्त नाही; पंकजा मुंडे यांचा संतप्त सवाल

पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसवायचा या जिद्दीने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. भाजपने भय आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी-चिंचवड अशा घोषणा पाच वर्षापूर्वी दिल्या होत्या. पण, या पाच वर्षात भय आणि भ्रष्टाचाराचा अंत झाला नाही. यापेक्षा जास्त वाढताना दिसत आहे. भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी-चिंचवड हाच मुद्दा घेऊन शिवसेना महापालिकेची आगामी निवडणूक लढविणार आहे. आम्ही दाखवून देऊ महापालिका कशी चालवायची, शहर कसे ठेवायचे, लोकांना सुरक्षा कशी द्यायची, असे राऊत यांनी सांगितले.

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, त्यांचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून गेलेले आहेत. आता हे अर्धे उठून राष्ट्रवादीत जातील. इथे ओरिजनल पक्ष शिवसेनाच आहे, असे सांगत बेडूक उड्यातून भय आणि भ्रष्टाचार मुक्त शहर होणार आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आघाडीबाबत बोलताना, ते योग्य वेळी ठरवू, सन्मानाने जागा वाटप झाले तर आम्ही आघाडीचा विचार करू, आघाडी होणार नाही असे आम्ही म्हणत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार गुंतले ठेकेदारीत

महापालिकेत जनतेच्या पैशांची लूट होत आहे. भय, भ्रष्टाचारमुक्त घोषणा ही ठेकेदारीची रिंग आहे. दोन्ही अमदारांसह इथले सगळे प्रमुख लोक महापालिकेतील ठेकेदारीमध्ये गुंतले आहेत. मात्र, आता महापालिकेतील भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणे मंत्रालयापर्यंत पोहोचली आहेत. स्मार्ट सिटीतील भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. त्याची तक्रार ईडीकडे करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

वाचा: इथिओपियाचं मेडीकल लायसन्स देतो असं सांगितलं आणि…

Source link

Pimpri Chinchwad Municipal CorporationSanjay Rautshiv senaपिंपरी-चिंचवड महापालिकाशिवसेनासंजय राऊत
Comments (0)
Add Comment