Bhaskar Jadhav: भास्कर जाधव विधानसभेचे अध्यक्ष?; भाजपला शह देण्याचा प्लान ठरला, पण…

हायलाइट्स:

  • विधानसभा अध्यक्षपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव.
  • महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत.
  • काँग्रेसने बदल्यात वनमंत्रिपद देण्याची केली मागणी.

मुंबई: दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेच्या कामकाजावर अंकुश ठेवणारे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी अचानकपणे पुढे आलं आहे. मुख्य म्हणजे विरोधी पक्ष भाजपच्या आक्रमकतेला नियमांच्या चौकटीत राहून जेरीस आणणाऱ्या जाधव यांच्या नावावर तिन्ही पक्षांचं जवळपास एकमत असल्याचंही सांगितलं जात आहे. दरम्यान, कोणत्याही तडजोडीशिवाय अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार असेल तर ते स्वीकारण्यास मी तयार आहे, असे जाधव यांनी सांगितले आहे. ( Maharashtra Assembly Speaker Latest Update )

वाचा: राज्यातील सर्व पोटनिवडणुका अखेर स्थगित; आयोगाने दिले ‘हे’ कारण

राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन अनेक अर्थांनी गाजले. या दोन दिवसांत बऱ्याच घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यात भाजपच्या आक्रमकतेला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने केलेली व्यूहरचना यशस्वी ठरली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर ते पद रिक्त असल्याने सरकारची कोंडी करण्याची विरोधकांची योजना होती. मात्र, अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाने भास्कर जाधव यांना तालिका अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पुढचे दोन दिवस सभागृहात जे काही घडले ते पाहता महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडल्याचे दिसले.

वाचा: दोन डोस घेतलेत त्यांना मुंबईत सवलती?; लोकलबाबत BMCने दिले ‘हे’ उत्तर

भास्कर जाधव यांनी विधानसभेचे कामकाज सक्षमपणे चालवले आणि नियमांच्या चौकटीत राहून विरोधकांचे मनसुबेही उधळले. दोन्ही दिवस जाधव यांनी आपली छाप सोडली. त्यात गोंधळ, धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याच्या कारणावरून भाजपच्या १२ सदस्यांवर एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई करून त्यांनी भाजपला मोठा धक्का दिला. याच आक्रमकपणामुळे भास्कर जाधव यांचे नाव अचानकपणे विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे. जाधव यांना विधानसभा अध्यक्ष करण्याबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत असल्याचे सांगण्यात येत असून काँग्रेसने याबाबत एक प्रस्तावही पुढे केल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसला नाना पटोले यांच्यासाठी मंत्रिपद हवं आहे. शिवसेनेने त्यांच्या कोट्यातील वनमंत्रिपद काँग्रेसला दिल्यास त्याबदल्यात काँग्रेस विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला सोडेल, असा हा प्रस्ताव असल्याचे कळते. यावर जाधव यांनी थोडी ताठर भूमिका मांडली आहे. मंत्रिपद सोडून त्याबदल्यात विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार असेल तर ते काही मला योग्य वाटत नाही. त्यामुळे कोणत्याही वाटाघाटीशिवाय हे पद मिळणार असेल तर मी ते स्वीकारायला तयार आहे, असे जाधव यांनी माध्यमांना सांगितले. जाधव यांच्या या भूमिकेनंतर आता महाविकास आघाडीत पुढे काय राजकारण रंगणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वाचा: मोठी बातमी : राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाची होणार चौकशी

Source link

bhaskar jadhav latest newsmaharashtra assembly speaker bhaskar jadhav newsmaharashtra assembly speaker latest newsmaharashtra assembly speaker latest updatemva on maharashtra assembly speakerउद्धव ठाकरेकाँग्रेसभास्कर जाधवमहाविकास आघाडीविधानसभा अध्यक्ष
Comments (0)
Add Comment