एरंडोल:-येथे परिसरात गेल्या तीन चार दिवसापासून पावसाळी वातावरण असून रोज अधून मधून अंधारून येते व पाऊस निश्चित पडेल असे चित्र दिसून येते परंतु पाऊस येतच नाही. रोज पाऊस हुलकावणी देत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचे कमबॅक झाले आहे कुठे नदी नाले तुडुंब भरले तर कुठे रस्त्याची नदी झाली. अशा बातम्या वृत्तवाहिनीवर दिसून येतात एरंडोल परिसरावर पावसाची कृपादृष्टी का होत नाही याबाबत चर्चेला ऊत आला आहे एवढेच नव्हे जळगाव जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झालेला आहे. पावसासाठी बळीराजा पद्मालया च्या गणपती ला साकडे घालत आहे.
जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरीसुद्धा जोरदार पावसाचे आगमन झाले नाही म्हणून खरीप पिके धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांचे अर्थचक्र धोक्यात आले आहे. दुबार पेरण्या करूनही पाऊस आलाच नाही तर शेतकऱ्यांनी या अस्मानी संकटाला कसे तोंड द्यावे असा प्रश्न उपस्थित होणार आहे.