(शैलेश चौधरी)
एरंडोल – कोरोनाच्या काळातील विद्यार्थ्यांचा लर्निंग लॉस लक्षात घेऊन तसेच येणाऱ्या काळातील ऑनलाईन लर्निंग चे महत्व लक्षात घेऊन माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रेरणेने जिल्ह्यामध्ये ‘वोपा’ या शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या संस्थेमार्फत व्ही- स्कूल कन्टेन्ट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सुरू करण्यात आलेला आहे. याद्वारे ‘व्ही स्कूल फ्री ॲप’ साठी इयत्ता पहिली ते दहावी करिता अभ्यासक्रम विकसन करणे सुरु आहे. प्रत्येक विषयासाठी जिल्हा विषय समित्या तयार करण्यात आल्या असून प्रत्येक विषय समितीचे प्रमुख निवडण्यात आले आहेत. जिल्ह्यातील इंग्रजी विषय समितीच्या प्रमुख पदी जे. एस. जाजू हायस्कूल उत्राण येथील प्रभारी मुख्याध्यापक भरत शिरसाठ यांची निवड माननीय जिल्हाधिकारी, जळगाव यांचे मार्फत करण्यात आली आहे. तसे आदेश त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहेत. सदर इंग्रजी विषय समितीमध्ये श्री.टी.बी. पांढरे (आर.आर.विद्यालय,जळगाव) व श्रीमती सपना रावलानी(आदर्श सिंधी हायस्कूल,जळगाव) यांची सहाय्यक म्हणून निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इंग्रजी विषय तज्ज्ञ शिक्षक या समितीमध्ये अभ्यासक्रम विकसनाचे काम करणार आहेत.
श्री.भरत शिरसाठ यांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिक या ठिकाणी इंग्रजी विषय सहाय्यक म्हणून दोन वर्ष सेवा दिली आहे. जळगाव जिल्हा इंग्लिश टीचर्स वेल्फेअर असोसिएशनचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. इंग्रजी विषयात त्यांची दोन पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच ‘इंग्लिश जर्नी वीथ यू’ या मासिकाचे त्यांनी संपादन केलेले आहे. जिल्ह्यात इंग्रजी विषयासाठी मेंटाॅर व एम.ई.आर म्हणून त्यांनी काम केले आहे. शिक्षण क्षेत्रात ज्या पुस्तकाचे प्रचंड स्वागत होत आहे, अशा ‘शिक्षक कसा असावा?’ या पुस्तकाचे ते लेखक आहेत.