सहकार खात्यामुळं महाराष्ट्रात भाजप सरकारची स्थापना?; शिवसेना म्हणते…

हायलाइट्स:

  • सहकार खात्याची धुरा अमित शहांकडे
  • राज्यात उलटसुलट चर्चांना उधाण
  • शिवसेनेनं मांडली भूमिका

मुंबईः ‘देशात सहकार चळवळीचे अर्थकारणच कोट्यवधी गरीब शेतकऱ्यांना जगवत असते. गुपकार गँग सर्वच क्षेत्रात असली तरी सहकार क्षेत्राचा नंबर त्यात शेवटचा आहे. हे क्षेत्र जगवणे, टिकवणे, त्यास बळ देणे हे केंद्राचे कर्तव्यच आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सहकार क्षेत्राची (Ministry of Cooperation)सूत्र हाती घेतल्यानं कोणाचा थरथराट होण्याचे कारण नाही. अमित शहा (Amit Shah)हे सहकार चळवळीतलेच कार्यकर्ते आहेत. नव्या सहकार मंत्र्यांचे स्वागत करायला काय हरकत आहे?,’ अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारमध्ये सहकार खाते तयार करुन त्याची सूत्रे अमित शहा यांच्याकडे दिल्यानंतर केंद्र सरकारचे सहकार खाते विविध राज्यांतील सहकार चळवळींबाबत काय धोरण स्वीकारणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. यावर शिवसेनेनं आज सामनाच्या अग्रलेखातून भूमिका स्पष्ट केली आहे.

‘गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालयाचा कार्यभार आल्यामुळे अनेकांच्या मनात विचारांचे तरंग निर्माण झाले आहेत. शहा यांच्याकडे सहकार खाते आल्याने या क्षेत्रावर आकाश कोसळेल असे भय निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहा हे महाराष्ट्रासारख्या राज्यातील सहकार क्षेत्राच्या नाडय़ा आवळतील, अनेक प्रकरणे खणून काढतील, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सहकारातील जे प्रमुख लोक आहेत त्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावतील व त्यातून महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजप सरकारची स्थापना ‘सहकारा’तून करतील असे जे बोलले जात आहे ते शहा यांची बदनामी करणारे आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचाः महाविकास आघाडीत काँग्रेसची पुन्हा कोंडी?

‘पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची फेररचना नुकतीच केली. त्यात सहकार मंत्रालयाची स्थापना नव्याने केली. हे खाते सहकार क्षेत्रातील कोणत्या तज्ञाला मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता, पण हे खाते गृहमंत्री अमित शहांच्या ताब्यात गेले. शहा यांना सहकार खात्यात काही सुधारणा करायच्या आहेत, म्हणजे नक्की काय करायचे आहे ते लवकरच दिसेल. याआधी कौशल्य विकास या नव्या मंत्रालयाची स्थापना झाली होती व हे खाते पंतप्रधानांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’चा एक भाग असल्याचे सांगण्यात येत होते. त्या खात्याने पुढे काय केले? हेसुद्धा समजून घेतले पाहिजे. आता नव्याने सहकार खाते निर्माण झाले व ते गृहमंत्र्यांनी आपल्या मुठीत ठेवले,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचाः मुंबईत फक्त ११ खड्डे शिल्लक; महापालिकेचा दावा

‘महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता हातची गेली ती सहकार क्षेत्रातील दिग्गज नेत्यांमुळे. तेव्हा महाराष्ट्रातील भाजपचा सहकारावर राग असणे स्वाभाविक आहे. मात्र महाराष्ट्र, गुजरातमध्ये सहकार चळवळ ही लाखो शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना जगवीत आणि तगवीत असते, हे विसरून चालणार नाही. ग्रामीण भागाचे संपूर्ण अर्थकारण जिल्हा सहकारी बँका, पतसंस्थांवरच अवलंबून आहे व हे सर्व काँग्रेसचे योगदान आहे. हे काम काँग्रेसने केले म्हणून मोडून पाडायचे यात शहाणपणा नाही,’ असं टोलाही शिवसेनेनं भाजपला लगावला आहे.

Source link

amit shahministry of cooperationSharad PawarShivsenaअमित शहाशिवसेनासहकार क्षेत्रसहकार खाते
Comments (0)
Add Comment