हायलाइट्स:
- अलिबागमध्ये काशिद पूल कोसळला
- कार-बाईक पाण्यात पडून एकाचा मृत्यू
- पुलावरून कार आणि बाईक पाण्यात वाहिली
मुंबई : राज्यात मान्सूनचं पुन्हा कमबॅक झाल्यानंतर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. सतत सुरू असलेल्या संततधारेमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी शिरलं असून काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशात अनेक अपघाताच्या घटनाही समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग मुरुड मार्गावरील काशिद येथील ब्रिटिशकालीन जीर्ण झाला पूल कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे.
या पुलावरून मोटरसायकल तसेच चारचाकी वाहने जात असतानाच पूल दुभंगला आणि गाड्या प्रवाहात कोसळल्या. या भीषण घटनेमध्ये सहा जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे मुरूडकडे जाणारी आणि अलिबागकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
या दुर्घटनेत एकूण सहा प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून एका व्यक्तीला किरकोळ जखम झाली आहे. या दुर्घटनेमुळे सगळीकडे वाहतूक कोंडी झाली असून मुरूडकडे जाणारी वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांचा खोळंबा झाला आहे.
खरंतर, अलिबाग-मुरुड महामार्गावर काशिद दरम्यान असणारा हा पूल जवळपास पन्नास वर्ष जुना आहे. या पुलाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. त्याचे स्लॅबसुद्धा खचले गेले होते. त्यामुळे पुलाची तपासणी करण्यात यावी आणि त्याची डागडुजी करावी अशी वारंवार मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. पण त्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष न घातल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर मुरुडकडे जाणाऱ्या वाहनांना रोहा सुपेगाव मार्गे वळविण्यात आले आहे. प्रशासनानं प्रवाशांना पुलावरून न जाण्याचा इशारा दिला असून पर्यायी मार्गावरून प्रवास करण्याचं आव्हान केलं आहे. रात्री आठ वाजताच्या सुमारास मुरुड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे नदीतल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात 50 वर्षांचा जीर्ण पूल वाहून गेला.