हायलाइट्स:
- जामनेर तालुक्यात भीषण अपघात
- भरधाव कारची दुचाकीला धडक
- ३ जणांनी गमावला जीव
जळगाव : भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने जामनेर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार दोन तरुणांसह कारचालक अशा तिघांचा मृत्यू झाला असून ही घटना आज सोमवारी दुपारी १.३० वाजता जामनेर तालुक्यातील पाळधी ते भवानी फाटा दरम्यान महामार्गावर घडली.
मोटारसायकलस्वार पंकज मोहन तायडे (वय ३२, रा. कलावसंत नगर, आसोदा रेल्वेगेट परिसर), धनंजय गंगाराम सपकाळे (वय ४२, रा. स्टेट बँक कॉलनी) व कारचालक प्रवीण प्रकाश पाटील (वय ४२, भराडी, ता. जामनेर) अशी मृतांची नावे आहेत.
धनंजय सपकाळे हे फॉर्च्युन फायनान्स कंपनीत शाखा व्यवस्थापक तर पंकज तायडे हे सेल्स एक्झिक्युटीव्ह आहेत. कंपनीचे कार्यालय गोविंदा रिक्षास्टॉप परिसरात आहे. नेहमीप्रमाणे दोघे जण सकाळी ९.३० वाजता कार्यालयात आले. यानंतर सकाळी ११ वाजता दोघेही शेंदूर्णी येथील एका कर्जदार ग्राहकाकडे स्थळ पडताळणीसाठी पंकजच्या दुचाकीने (एमएच १९ डीआर १४१९) निघाले होते.
काम आटोपल्यांनतर दुपारी एक वाजेच्या सुमारास ते परत जळगावात येण्यासाठी निघाले. यावेळी पाळधी ते भवानी फाटा दरम्यान महामार्गावर समोरुन येणाऱ्या कारने (एमएच १९ सीयु ७१६१) दुचाकीस जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार पंकज व धनंजय हे थेट सहा ते सात फुट उंच हवेत फेकले गेले आणि रस्त्याच्या कडेला पडले. तर त्यांना धडक देणारी कार देखील काही अंतर पुढे जाऊन रस्त्याच्या बाजूला कलंडली.
या दुर्घटनेत कारचालक प्रवीण पाटील यांचाही मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. नागरिकांनी प्रवीण पाटील व धनंजय सपकाळे या दोघांना पहुरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर पंकजला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. पण, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबियांनी जळगाव रुग्णालयात धाव घेतली. पंकजचा भाऊ, आई, पत्नी यांना रुग्णालयातच ग्लानी आली होती. पंकज याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ व एक मुलगी असा परिवार आहे. चार महिन्यांपूर्वीच त्याने नवीन दुचाकी खरेदी केली होती. धनंजय यांचा मृतदेह पहुर ग्रामीण रुग्णालयात असल्याने त्यांचे नातेवाईक पहुरला पोहोचले होते. धनंजय यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.