हायलाइट्स:
- भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाज विरोधी.
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप.
- मुंडे, खडसेंचा संघटनेसाठी वापर करून डावलले.
मुंबई: ‘भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाज विरोधी असून या समाजातील लोकांचा ते वापर करून घेतात व नंतर त्यांना बाजूला करतात, याचा वारंवार अनुभव आलेला आहे. आधी गोपीनाथ मुंडे नंतर एकनाथ खडसे आणि आता पंकजा मुंडे यांच्याबाबतीतही तेच घडले आहे. भाजपकडून आता पंकजा यांना डावलले जात आहे,’ अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपच्या राजकारणावर तोफ डागली. ( Nana Patole Pankaja Munde Latest News )
वाचा:ज्या दिवशी घराचं छत अंगावर पडेल तेव्हा बघू; पंकजा मुंडे यांचा सूचक इशारा
एकनाथ खडसे यांना बदनाम करण्याचे काम भाजपने केले आहे. झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाला अशा बातम्या येत असल्या तरी खडसेंना बदनाम करण्यासाठीच घोटाळ्याचे षडयंत्र रचले गेले असू शकते असा संशय येतो, असे पटोले यांनी पुढे नमूद केले. भाजप हा बहुजन समाज विरोधी पक्ष असून त्यांच्यामुळेच ओबीसी व मराठा समाजाचे आरक्षणही कोर्टात रद्द झाले आहे, असा आरोप पटोले यांनी केला.
वाचा: भागवत कराड यांना मी अपमानित का करू?; पंकजा मुंडे यांचा सवाल
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पाडण्याचा भाजप आटोकाट प्रयत्न करत आहे पण त्यात त्यांना यश आले नाही. याचाच एक भाग म्हणून मविआ सरकारच्या विरोधात सुरुवातीपासून बदनामीची मोहीम राबवली गेली. १०० कोटी रुपयांचे वसुलीप्रकरण त्यातीलच एक असून ज्यांनी आरोप केला त्या परमबीर सिंग यांची चौकशी का केली जात नाही? मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर जिलेटिनच्या कांड्या कोणी ठेवल्या?, हा मुख्य मुद्दा असताना त्याचा तपास केला जात नाही, हे सर्व स्क्रिप्टेड असून त्याप्रमाणेच सगळं काही होत आहे, असे पटोले म्हणाले. टिळक भवन येथे ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
वाचा: तुमचे ऋण मी या जन्मी फेडू शकेन का?; नारायण राणे यांचं हे पत्र आहे खास
जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भाजपाचा डाव
पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सामान्य जनता महागाईने बेहाल झाली आहे आणि मोदी सरकार देशाला लुटायचे काम करत आहे, त्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून सामान्य माणसांसाठी संघर्ष करत आहे. मोदी सरकार लसीकरणात अपयशी ठरले आहे. चिनी सैन्याने घुसखोरी केली आहे. या महत्त्वाच्या प्रश्नावर मोदी सरकार चकार शब्द काढत नाही. काँग्रेस या मुद्द्यावरून मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवत असताना भाजप जनतेचे लक्ष मुख्य प्रश्नावरून दुसरीकडे वळवत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.
वाचा:काँग्रेस नेते शरद पवार यांच्या घरी; पटोले अनुपस्थित, राजकीय वर्तुळात चर्चा