हायलाइट्स:
- नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकेल असा नेता कोण?
- शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलं शरद पवारांचं नाव.
- काँग्रेसमध्ये राष्ट्रीय स्तरावर नेतृत्वाचा प्रश्न कायम आहे!
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत आव्हान उभे करायचे असेल तर विरोधी पक्षांना एकजूट होऊन एका सक्षम नेत्याकडे या आघाडीचे नेतृत्व द्यायला हवे आणि हा नेता आताच्या घडीला शरद पवार यांच्याशिवाय दुसरा कुणीही असू शकत नाही. मोदींपुढे शरद पवार हेच सक्षम पर्याय ठरू शकतात, असे मोठे विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ( Sanjay Raut On 2024 Lok Sabha Election )
वाचा:‘हृदय दिल्लीत आणि मेंदू नागपुरात असणारे हे मायावी सरकार आहे’
देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सक्षम पर्याय ठरेल अशी आघाडी उभी राहावी, यासाठी हालचाली सुरू आहेत. यूपीएचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसची यात काय भूमिका असणार, हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी वाढल्या आहेत. किशोर यांनी शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतली तर अलिकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांनाही ते भेटले. या स्थितीत भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील आघाडीचा चेहरा कोण असणार, हा कळीचा प्रश्न असून त्याअनुषंगाने संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
वाचा: शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी?
मोदींपुढे पर्याय उभा करत असताना निश्चितच काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पण वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. काँग्रेसमध्ये राष्ट्रीय स्तरावर नेतृत्वाचा प्रश्न कायम आहे. आजही पक्षाला अध्यक्षाची निवड करता आलेली नाही. राहुल गांधी निश्चितच मोठे नेते आहेत मात्र त्यांच्यापेक्षाही अनुभवी असे नेतृत्व या देशात आहे आणि ते म्हणजे शरद पवार आहेत, असे राऊत यांनी नमूद केले.
वाचा: काँग्रेसवर शरसंधान; पटोलेंच्या वक्तव्यांच्या निमित्ताने पवारांचा नेत्यांना संदेश
प्रशांत किशोर यांच्याबाबत बोलताना राऊत यांनी अनेक बाबींकडे लक्ष वेधले. प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमध्ये चांगले काम केले. तृणमूल काँग्रेसच्या विजयात त्यांचा हातभार लागला. त्यांनी महाराष्ट्रात आमच्यासोबतही काम केले होते. आता देशपातळीवर ते सक्रिय झाले आहेत. त्यांना नेमकं काय करायचं आहे हे माहीत नाही पण विरोधी पक्षाला एकत्र आणण्यात त्यांचं मोठं योगदान राहू शकतं. राजकारणाबाहेरची व्यक्ती असे काही करत असेल तर त्याला अधिक प्रतिसाद मिळतो, असे नमूद करत विरोधकांची एकजूट शक्य असल्याचेच संकेत राऊत यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे आव्हान उभं करणं तितकंसं सोपं नाही. करोनाची दुसरी लाट आल्यानंतर काही प्रमाणात मोदी यांची लोकप्रियता कमी झाली असेलही पण शेवटी ते मोदी आहेत. आजच्या घडीला ते देशातील सर्वात मोठे नेते आहेत हे नाकारून चालणार नाही, असेही राऊत पुढे म्हणाले. गेल्या सात वर्षांत भाजपला जे यश मिळाले आहे त्याचे कारण केवळ नरेंद्र मोदी हे आहेत. देशपातळीवर आज तरी मोदींना पर्याय ठरेल असा चेहरा विरोधी पक्ष देऊ शकलेला नाही. २०२४च्या निवडणुकीत हा चेहरा विरोधी पक्ष देऊ शकला नाही तर मोदींना हरवणं अशक्य आहे. मला विचाराल तर मोदींपुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच सक्षम पर्याय ठरू शकतात, असे राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
वाचा: ‘उद्धव ठाकरेंनी आषाढी एकादशीला शरद पवारांनाच अभिषेक करावा’