हायलाइट्स:
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट.
- शिवसेनेतर्फे लोणकर कुटुंबाला दिली १० लाख रुपयांची मदत.
- स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी आपण प्रयत्न करणार- एकनाथ शिदे.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने निराश होऊन आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर या तरुणाच्या कुटुंबीयांची शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. या वेळी शिंदे यांनी लोणकर कुटुंबाला शिवसेनेकडून १० लाख रुपयांची मदत केली. या शिवाय स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. (shiv sena donated rs 10 lakh to swapnil lonakar family)
स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ही माहिती दिली. राज्यातील प्रलंबित भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, असे शिंदे म्हणाले. एमपीएससीचा कारभार पारदर्शक असला पाहिजे असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येची गंभीर दखल घेतली असून एकूण १५ हजार ५०० पदे तातडीने भरण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच त्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या कार्यवाहीला देखील सुरुवात झाली आहे, असे सांगतानाच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे शिंदे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- खडसेंची अडचण वाढली; जावई गिरीश चौधरी यांच्या कोठडीत आणखी वाढ
लोणकर कुटुंबीय म्हणतात, सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही स्थिती
राज्यात सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. अशी स्थिती असताना करोनामुळे तर मोठा आघात झाला आहे. अशा परिस्थितीत आपली कमावती मुले हीच आपल्यासाठी आधार असतात, अशा काळात जर सरकारच्या नाकर्तेपणामुळे कर्ती मुली सोडून गेली तर कुटुंबीयांनी करायचे काय?, असा सवाल करतानाच सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्नीलने आत्महत्या केल्याचा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केला आहे.
क्लिक करा आणि वाचा- बहुमत आहे, तर मग घाबरता कशाला?; विधानसभा अध्यक्ष निवडीवरून फडणवीसांचा टोला
‘संभाजीराजेंच्या मागण्यांची अंमलबजावणी महिन्याच्या अखेरीस’
या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मंत्री एकनाथ शिंदे यांना खासदार संभाजीराजे यांच्या मागण्यांबाबत प्रश्न विचारले. त्यावर बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या विषयावर मुंबईतील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली असून या महिन्याच्या अखेरपर्यंत खासदार संभाजीराजे यांच्या मागण्यांवर अंमलबजावणी केली जाईल.
क्लिक करा आणि वाचा- इंधन दरवाढीचा निषेध, पंतप्रधानांना कुरिअरने पाठविल्या शेणाच्या गोवऱ्या