म. टा. वृत्तसेवा, पंचवटीः अमृतधाम येथील औदुंबर नगर रस्त्यावरून मोलमजुरी करणारी शीतल विकी कांबळे ही गरोदर महिला शुक्रवारी (दि. २९) दुपारी एक वाजेच्या सुमारास जात असताना, तिच्या पोटात प्रसवकळा सुरू झाल्या. तेव्हा ती महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसली व तेथेच ती बाळंत झाली. स्थानिक डॉक्टर व माजी नगरसेविका यांची तातडीने मदत मिळाल्याने महिलेचे बाळंतपण सुकर झाले. बाळंतीण आणि तिने जन्म दिलेल्या दोन्ही जुळ्या मुली सुखरूप आहेत.
शीतल कांबळे ही महिला झाडाखालीच बाळंत होत असल्याचे परिसरातील महिलांनी बघितले. त्यांनी त्वरित जवळच असलेले डॉ. राजेंद्र बोरसे व माजी नगरसेविका प्रियंका माने यांच्याशी संपर्क साधला. डॉ. बोरसे हे त्यांच्या क्लिनिकमध्ये पेशंट सोडून तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्या महिलेच्या बाळंतपणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. शीतल कांबळे या महिलेने दोन जुळ्या गोंडस मुलींना जन्म दिला. तोपर्यंत माजी नगरसेविका प्रियंका माने यांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्र इथून डॉ. बस्ते व दोन महिला परिचारिका वैशाली धिवर, छाया जाधव यांना आपल्या वाहनात तत्काळ घेऊन घटनास्थळी धाव घेतली.
पंचवटी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांना फोन करून डॉ. बोरसे यांचे बोलणे करून दिले. ॲम्बुलन्स बोलवून सदर महिलेला इंदिरा गांधी रुग्णालय येथे पाठविण्यात आले. आईसह दोन्ही जुळ्या मुली सुखरूप आहेत. डॉ. बोरसे व माजी नगरसेविका माने यांनी त्वरित मदत केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.