उद्धव ठाकरे ठरले लोकप्रिय मुख्यमंत्री! भाजप म्हणतो…

हायलाइट्स:

  • उद्धव ठाकरे ठरले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री
  • विरोधी पक्ष भाजपनं दिली पहिली प्रतिक्रिया
  • १३ राज्यांमध्ये वणवण करायची काय गरज होती? – केशव उपाध्ये

मुंबई: देशातील १३ राज्यांमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात उद्धव ठाकरे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाविकास आघाडीतही आनंद व्यक्त होत आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते भाजपनं मात्र यावरून सरकारला खोचक टोला हाणला आहे. (BJP on most Popular Chief Minister Uddhav Thackeray)

‘प्रश्नम’ या संस्थेनं अलीकडंच १३ राज्यांमध्ये एक पाहणी केली होती. त्या त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या कामाबाबत नागरिकांना प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली. ‘मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असून आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू’ असं मत ४९ टक्के मतदारांनी नोंदवलं आहे. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पाचव्या स्थानी आहेत. त्यावरून भाजपला चिमटेही काढण्यात येत होते.

वाचा:मुंबई-नाशिक महामार्गावर टोमॅटोचा ट्रकचा उलटला; २० टन टोमॅटोचे नुकसान

महाराष्ट्र भाजपनं आता या सर्वेक्षणाबद्दल आपलं मत नोंदवलं आहे. राज्य भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘महाराष्ट्रातल्या एक हजार लोकांमध्ये झालेल्या सर्वेक्षणात ६०० लोकांनी मते दिली. या आधारावर उद्धव ठाकरे हे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. एवढीच मते मिळवायची होती तर १३ राज्यांत वणवण करण्याची काय गरज होती? एखाद्या हाउसिंग कॅाम्प्लेक्समधील निवडणुकीतही जास्त मतदार भेटले असते आणि ‘लोकप्रियता’ही कळली असती,’ असा खोचक टोला उपाध्ये यांनी हाणला आहे.

‘प्रश्नम’च्या या सर्वेक्षणात मुख्यमंत्री ठाकरे यांच्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्याबद्दल ४४ टक्के लोकांनी सकारात्मक मत नोंदवलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे तिसऱ्या स्थानी असून ४० टक्के मतदारांनी त्यांना पारड्यात मतं टाकली आहेत. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन चौथ्या तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाचव्या स्थानी आहेत.

वाचा: ‘महाराष्ट्र भाजपचे राजकारण दुसऱ्या टोकाचे; ते पंतप्रधानांना जुमानत नाही’

Source link

BJP on Most Popular CM SurveyKeshav Upadhyemaha vikas aghadimost popular chief ministerUddhav Thackerayउद्धव ठाकरेकेशव उपाध्येभाजपमहाविकास आघाडीयोगी आदित्यनाथ
Comments (0)
Add Comment