वाहनचोरीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानाव

मुंबई,दि.०१ :- राज्यात गेल्या काही वर्षांपासून वाहनचोरीच्या घटनांत वाढ झाली असून चोरीच्या वाहनांची २४ तासांत विल्हेवाट लावणाऱ्या टोळय़ाही सक्रिय आहेत. त्यामुळेच वाहनचोरीमध्ये राज्य तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले. राज्यात २०२१ पासून जवळपास २५ हजार ७०० वाहने चोरी गेल्याची नोंद पोलिसांकडे आहे.

वाहनचोरांच्या अनेक टोळय़ा कार्यरत असून देशभरातून प्रतिवर्ष १ लाख ९० हजारांवर चारचाकी आणि दुचाकी वाहनचोरी होते. वाहनचोर ‘स्मार्ट’ झाले असून ते ‘मास्टर की’ आणि विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून वाहनांची चोरी करीत असल्याची बाब समोर आली आहे. वाहन चोरी करण्यासाठी टोळय़ांमधील सदस्य वेगवेगळय़ा क्लृप्तय़ांचा वापर करीत असून चोरीच्या वाहनांची विल्हेवाट लावण्याच्या व्यवस्थेतही ते पटाईत आहेत. तसेच चोरीच्या वाहनांची चोवीस तासांत वाहनाची विल्हेवाट लावत असल्याने ते पोलिसांच्या हाती सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

देशात वाहन चोरी होण्याचे सर्वाधिक प्रमाण नवी दिल्लीत असून ४० हजारांवर वाहनांची दरवर्षी चोरी होते, अशी नोंद दिल्ली पोलिसांकडे आहे. द्वितीय क्रमांकावर उत्तर प्रदेश असून येथून २६ हजारांवर वाहने चोरी झालेली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. राज्यातून २४ हजारांवर वाहने चोरी झाल्याची नोंद असून मुंबई पहिल्या स्थानावर, पुणे दुसऱ्या, तर नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील चवथा क्रमांक राजस्थान आणि पाचव्या क्रमांकावर कर्नाटक आहे.

चोरीची नवी पद्धत..

वाहनचोरांच्या टोळय़ा शहरात दाखल होऊन काही दिवस टेहळणी करतात. त्यानंतर रस्त्यांचा अभ्यास करून महागडय़ा मोटारींवर लक्ष केंद्रित करतात. नियोजन करीत ‘मास्टर चावी’चा वापर करून मोटार चोरतात. पोलिसांत तक्रार होण्यापूर्वीच ती मोटार राज्याच्या सीमेवर पोहोचवतात. तेथून दुसरी टोळी बनावट क्रमांक पाटी लावून मोटार दुसऱ्या राज्यात घेऊन जातात. तेथे परिवहन विभागाच्या दलालांच्या मदतीने बनावट क्रमांकाची कागदपत्रे तयार करण्यात येतात. तसेच मोटारीचा रंग बदलण्यात येतो. अशा प्रकारे फक्त चोवीस तासांत कारची अन्य राज्यात विक्री केली जाते.

मागणीनुसार मोटारचोरी..

वाहनचोरांच्या टोळय़ा मागणीनुसार मोटारींची चोरी करीत असल्याचे नागपुरातील गणेशपेठ पोलिसांनी पकडलेल्या टोळीच्या चौकशीतून समोर आले. मोटारचोरीच्या या बेकायदा व्यवसायात कमी दुरुस्ती खर्च आणि अधिक किंमत असलेल्या वाहनांना अधिक मागणी असते. त्याचप्रमाणे अधिक प्रवासी संख्या क्षमता असलेल्या वाहनांचीही मागणी जास्त असते. मोटारीची मागणी केल्यानंतर अगदी दोन ते तीन दिवसांत मोटार उपलब्ध करून देण्याइतपत वाहनचोरांच्या टोळय़ांची मजल गेली आहे.

पोलिसांची तपासात निष्क्रियता..

राज्यातील प्रत्येक शहरात वाहनचोरीचे वाढते गुन्हे पाहता पोलिसांनी वाहन चोरीविरोधी पथके स्थापन केली आहेत. अशा पथकांचे गुन्हे उघडकीस आणण्याकडे नेहमी दुर्लक्ष असते. त्यामुळेच परराज्यातील टोळय़ा येऊन राज्यातून वाहने चोरून नेत आहेत. फक्त ‘सीसीटीव्ही फुटेज’च्या भरोशावर पोलीस पथके राहतात. त्यामुळे वाहनचोरांच्या टोळय़ा पोलिसांना नेहमी गुंगारा देत असल्याची माहिती समोर आली आहे.

‘एनसीआरबी’च्या नोंदीनुसार चोरी गेलेली वाहने

एकूण वाहने : १ लाख ९५ हजार

दुचाकी : १ लाख ६६ हजार चारचाकी: १६ हजार ३५४ मालवाहू वाहने : ३ हजार ४९४

Comments (0)
Add Comment