हायलाइट्स:
- महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र?
- देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
- चंद्रकांत पाटील- राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर
नागपूरः मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मनसेसाठी धक्का मानला जात आहे. त्यामुळं आगामी निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी मनसे भाजप युती होणार का?; या चर्चा रंगताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दिल्लीत होते. ते आज दिल्लीहून नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती होणार का?, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला. त्यावर त्यांनी योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
वाचाः अमृता फडणवीसांचा पुन्हा शिवसेनेला टोला; फोटो ट्वीट करत म्हणाल्या…
मनसेनं परप्रांतीयांचा मुद्दा सोडला तर त्यांच्याशी युती होऊ शकते, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याकडे देवेंद्र फडणवीसांचं लक्ष वेधलं असता त्यांनी चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य तुम्ही पूर्णपणे समजून घेत नाही. मनसेसोबत युतीचा निर्णय योग्यवेळी होईल. अजून त्याला वेळ आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, दिल्लीत नवीन केंद्रीय मंत्र्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. व केंद्रात कामं असतात त्यासाठी जावं लागतं त्याचा राजकीय अर्थ काढू नका, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
वाचाः मोदींच्या सभेत काळे मास्क खेचून काढले त्याचे कारण काय?; शिवसेना
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मनसे- भाजप युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नाशिक महापालिकेबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार का?; याबाबत चर्चा रंगली आहे.
वाचाः बड्या नेत्याला रात्री अटक होऊ शकते; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?