वसई ते विरार भव्य तिरंगा पदयात्रा संपन्न स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बहुजन विकास आघाडीचा अभिनव उपक्र

मुंबई,दि.१४ : – यंदाचा स्वातंत्र्यदिन हा सर्वार्थाने वेगळा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व घटनेला यंदाच्या १५ ऑगस्ट रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. हा स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव अजरामर आणि अविस्मरणीय ठरावा या उद्देशाने बहुजन विकास आघाडीने वसई ते विरार अशा भव्य पदयात्रेचे आयोजन केले होते. ‘राष्ट्राभिमान व्यक्त करा, तिरंगा पदयात्रेत मोठ्या संख्येने सामील व्हा’ असे आवाहन बहुजन विकास आघाडीतर्फे तमाम जनतेला करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजता वसईतून सुरू झालेल्या या पदयात्रेचा समारोप दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास विरार येथे झाला.

शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद हे या पदयात्रेचे वैशिष्ट्य ठरले. तब्बल ३०० फूटांहून अधिक लांबीचा तिरंगा हे या पदयात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य होते. सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी यांनी हा तिरंगा आपल्या हाताने शिरावर उचलून धरला होता. तिरंग्याचे हे छत्र आपल्या डोक्यावर असून, या तिरंग्याच्या छत्राखाली देशातील जनता एकसंध होत; आपल्या या देशाचे नाव संपूर्ण विश्वात आणखी उज्ज्वल व्हावे यासाठी कटीबद्ध आहे, असा संदेश या पदयात्रेच्या निमित्ताने देण्याचा प्रयत्न करण्यात आला. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि आमदार क्षितीज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा संपन्न झाली.

याप्रसंगी प्रथम महापौर राजीव पाटील, मा. महापौर रुपेश जाधव, मा. महापौर प्रवीण शेट्टी, मा. उपमहापौर उमेश नाईक, पंकज ठाकूर, नारायण मानकर यांसह जिल्हाधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सामान्यातील सामान्यांनीही आपले योगदान दिले. या सामान्यांच्या असामान्य शौर्य आणि बलिदानामुळे आपला देश पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त झाला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या तमाम वीरांना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आदरांजली वाहिली.

स्वतंत्र भारताला बलशाली बुद्धीशाली आणि सुजलाम सुफलाम करणाऱ्या कष्टकरी, शेतकरी, वैज्ञानिक, बुद्धिजीवी, साहित्यिक, कलाकार आणि सैनिकांच्या योगदानाला शतशः नमन. असंख्य अडचणी समस्यांवर मात करत आपला देश हा सामर्थ्यवान झाला मातृभूमी स्वतंत्र झाल्याच्या ऐतिहासिक क्षणाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल या देशासाठी झटणाऱ्या अनंत हातांना नमन करत या पदयात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकाबद्दल आपण कृतज्ञ असल्याची भावना आमदार क्षितीज ठाकूर यांनी व्यक्त केली.

Comments (0)
Add Comment